अमरावती : खासगी बाजारात भाव पडल्याने तुरीची 'एमएसपी'नुसार (MSP) शासकीय खरेदी करण्यात यावी व सोयाबीनच्या खरेदीसाठी पोर्टल (Portal) सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी अमरावती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागणीचे निवेदन आरडीसी यांना दिले.
यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने तुरीला (Tur) ७ हजार ७५० रुपये आधारभूत किंमत ठरविली आहे. परंतु खासगी बाजारात यापेक्षा कमी भावाने तुरीची विक्री होत आहे.
भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने तुरीची खरेदी(Tur Purchase) होऊ नये व या प्रकाराला आळा घालण्यासाठी तुरीची शासन खरेदी करण्याची मागणी अमरावती बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी निवेदनाद्वारे केली.
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली असली तरी नोंदणी व खरेदी संदर्भात असलेले पोर्टल अद्याप बंद आहे. हे पोर्टल त्वरित सुरू करण्यात येऊन सोयाबीनची शासनमान्य दराने खरेदी करण्याची मागणी मोरे यांनी केली.
यावेळी उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, संचालक किशोर चांगोले, प्रकाश काळबांडे, नाना नागमोते, मिलिंद तायडे, अलका देशमुख, रेखा कोकाटे, श्रीकांत बोंडे, आशुतोष देशमुख, प्रकाश कोकाटे, शैलेश काळबांडे, अल्केश काळबांडे यांच्यासह अन्य संचालक व पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
बाजार समितीचे आवारात शेतमाल हमीभावाच्या आत
बाजार समितीचे आवारात सध्या सर्वच शेतमाल हमीभावाच्या आत विकल्या जात आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची याची गंभीर देखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : जालना बाजारात तुरीची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर