उदगीर : मागील दोन दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीचीtur आवक सुरू झाली आहे. दर ८ हजार ते ८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल असून, वेळ अमावास्येनंतर तुरीच्या राशी सुरू होतील. त्यानंतर मालाची आवक वाढेल; परंतु शेतकऱ्याचे प्रमुख असलेल्या सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे.
मध्यंतरी ४ हजार २०० रुपयांपर्यंत सोयाबीनचा दर गेला होता. तो घसरून ४ हजारांपर्यंत खाली आला असल्याने सोयाबीनची आवक कमी झाली आहे. सोयाबीन प्रक्रियादार कारखान्याकडून मागणी नसल्याने मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर घसरत आहेत.
वेळ अमावास्येनंतर उदगीर भागात तुरीच्या राशीचा हंगाम सुरू होतो. सुरुवातीला हलक्या जमिनीवरील तुरीची रास होते.
गुरुवारी(१९ डिसेंबर) रोजी उदगीर बाजारात ४०० ते ५०० क्विंटल नवीन तुरीची आवक झाली होती. मालात ओलावा व अडकऱ्याचे प्रमाण बघून दर ८ हजार ते ८४०० पर्यंत मिळाला.
हंगामाच्या सुरुवातीला तुरीचा १० हजार ३०० रुपये असलेला दर घसरून आता ८ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे तुरीच्या दरात मागील एकाच आठवड्यात २ हजार ५०० पर्यंतची घसरण झाल्याचे दिसून येते.
मार्केट यार्डमध्ये शेजारच्या कर्नाटक सीमावर्ती भागातून, तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागांतून तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यामुळे शहरात डाळींचे कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत.
चांगल्या प्रतीच्या तुरीची उपलब्धता असल्याने उदगीरचा तूरडाळीचा व्यापार देशात प्रसिद्ध आहे. उच्च प्रतीची तूरडाळ तयार होत असल्याने देशाच्या अनेक भागांतून डाळीला चांगली मागणी असते. डाळीला चांगली मागणी असल्याने या बाजारात तुरीला दरसुद्धा इतर बाजाराच्या तुलनेत चांगला मिळतो, असे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.
उत्पादन चांगले; दर घसरणार
* चांगल्या प्रतीच्या तुरीची उपलब्धता असल्याने उदगीरचा तूरडाळीचा व्यापार देशात प्रसिद्ध आहे. उच्च प्रतीची तूरडाळ तयार होत असल्याने देशाच्या अनेक भागांतून डाळीला चांगली मागणी असते.
* डाळीला चांगली मागणी असल्याने या बाजारात तुरीला दरसुद्धा इतर बाजारांच्या तुलनेत चांगला मिळतो.
* जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून तुरीचा हंगाम सुरू होईल; परंतु यंदा तुरीचे उत्पादन चांगले होणार असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात आणखी दर कमी होतील, असे व्यापारी बालाजी बच्चेवार यांनी सांगितले.
केंद्रावर नाकारलेला शेतमाल बाजारात...
* खरिपाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत चालल्याने शेतकऱ्याच्या चिंता वाढल्या आहेत.
* हमीदर केंद्रावर नावे नोंदवलेल्या शेतकऱ्यांची खरेदी सरकारकडून सुरू असल्याने बाजारात आवक कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत; परंतु हमी दर केंद्रावर नाकारलेला माल बाजारात विक्री केल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्याला मिळेल त्या दरात त्यांचे सोयाबीन विकावे लागत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीनची सुवर्ण कहानी आहे तरी काय?...... वाचा सविस्तर