Tur Market: बाजार व्यवस्थेकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आधीच सोयाबीन आणि कपाशी हमीपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकरी हताश असताना आता तुरीच्या दरातही प्रचंड घसरण झाली आहे.
बाजार समित्यांत तुरीची हमीपेक्षा कमी दराने खरेदी होत असून, तुरीला सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी दर मिळत आहे.
गेल्या हंगामात तुरीचे दर १३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीच्या पेरणीवर अधिक भर दिला.
परिणामी वाशिम जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र वाढले. तथापि, अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. त्यानंतर ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता.
आता उरल्यासुरल्या तुरीची कापणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून बाजारात नवी तूरही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तुरीचा हंगाम सुरू होत असताना बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण आहे.
शासनाने तुरीला ७ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव घोषित केला असताना बाजार समित्यांत तुरीची सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी दराने खरेदी होत आहे.
२० दिवसांतच अडीच हजार रुपयांची घसरण
जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे कमाल दर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. त्यानंतर मात्र दिवसेंदिवस तुरीच्या दरात घसरण होत गेली आणि अवघ्या २३ दिवसांतच तुरीचे कमाल दर क्विंटलमागे २ हजार ५०० रुपयांनी घसरून थेट ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवरच आले आहेत.
पुन्हा ओलाव्याचा कांगावा ?
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात नव्या तुरीच्या खरेदीचा मुहूर्त पार पडला. शिवाय मराठवाडा व कर्नाटक राज्यातही तुरीचा हंगाम सुरू झालेला आहे. आता नवी तूर बाजारात दाखल होणार असताना पुन्हा या शेतमालात ओलावा असल्याचा कांगावा करून तुरीचे दर पाडण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून होण्याची शक्यता वाढली आहे.
असे घसरत गेले तुरीचे दर
महिना | दर (प्रति क्विंटल) |
जानेवारी | १०,००० |
फेब्रुवारी | १०,४२५ |
मार्च | १०,१०० |
एप्रिल | ११,९५५ |
मे | १२,७०० |
जून | १२,००० |
जुलै | १०,८०० |
ऑगस्ट | १०,७२५ |
सप्टेंबर | १०,४५५ |
ऑक्टोबर | ९,८५० |
नोव्हेंबर | ९,९०० |
डिसेंबर | ७,२०० |