Tur Market : मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने व तुरीवरील रोगराईमुळे शेतकऱ्यांना उत्पादन झाले नाही. मागील वर्षी तुरीला १२ हजार क्विंटलपर्यंत भाव होता. यंदा नवीन तूरबाजारात येताच ७ हजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.
विधानसभा निवडणूक आटोपताच सोयाबीन, तूर, हरभरा व कापूस पिकांचे भाव हमीदरापेक्षा कमी झाले आहेत. 'नाफेड', 'सीसीआय'मध्ये अटी, शर्तीचा भरणा असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
आतापर्यंत प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांपेक्षा असलेले तुरीचे भाव खूपच खाली आले आहेत. गुरुवारी खामगाव बाजार समितीमध्ये तुरीला प्रतिक्विंटल कमीत कमी ५ हजार रुपये ते जास्तीत जास्त ८ हजार ७०० रुपये दर मिळाला.
गुरुवारी(२ जानेवारी) ५०० क्विंटल तुरीची आवक झाली. वर्षभर तुरीला १० ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. नवीन तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे भाव ५ हजारांपासून ८७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. १५ दिवसांत क्विंटलमागे अडीच ते तीन हजार रुपयांनी कमी झाले आहे.
सोयाबीनला हंगामापासून हमीभाव मिळालेला नाही, तर कापसाचीही हीच स्थिती आहे. यंदा खरिपात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीने शेतात पाणी साचले. त्यामुळे तूर पिवळी पडली आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. काही भागांतील तूर जागेवरच सुकली आहे. शिवाय
तूर बहरावर व शेंगा भरण्याच्या काळात फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ८ ते १० दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पाऊससुद्धा पडल्याने शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला झाला.
या परिस्थितीत तुरीच्या सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीची मागणी वाढून उच्चांकी भाव मिळेल, अशी अपेक्षा असताना हंगामाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने घसरण
सध्या हलक्या प्रतवारीच्या जमिनीतील तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. शिवाय मराठवाड्यासह कर्नाटक राज्यातही तुरीचा हंगाम सुरू झाला आहे. या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने दरात घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तालुक्यात जानेवारीत तुरीचा हंगाम सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांद्वारे आतापासूनच दर पाडण्यास सुरुवात होत असल्याचा आरोप होत आहे.
तुरीवर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव
परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने तूर पिवळी पडली आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन तुरीवर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव झाला. काही भागांतील तूर जागेवर वाळून गेली. त्यामुळे तुरीची मागणी वाढून उच्चांकी भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, कोणत्याच मलाला हमीभाव मिळाला नाही.
उत्पादनात मोठी घट
• तुरीसह सोयाबीनला हंगामापासून हमीभाव मिळालेला नाही, तर कापसाचीही हीच स्थिती आहे. यंदा खरिपात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले.
• सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना नुकसान झाले. त्यामुळे एकरी ३ ते ७ क्विंटलपर्यंत उत्पन्न झाले.
शेतकऱ्यांनी तूर वाळविल्यानंतरच विकावी
शेतकऱ्यांची नवीन तूर हाती येत आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या नवीन तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे नवीन तुरीला बाजारात भाव कमी मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंगनंतर तुरीला उन्हात वाळू घालून आर्द्रता कमी झाल्यानंतरच बाजारात विक्रीसाठी आणावी. - ए. जे. बोराडे, सभापती, कृउबा समिती, मंठा
शेतमाल | हमीभाव | बाजारभाव |
तूर | ७,५५० | ५,००० ते ८,७०० |
सोयाबीन | ४,८९२ | ३,८०० ते ४,१०० |
हरभरा | ५,६५० | ५,८०० ते ६,०२१ |
कापूस | ७,५२१ | ७,१५० ते ७,५०० |