अमरावती : तुरीच्या शासन खरेदीसाठी (Tur kharedi) महिनाभरापासून २१ केंद्रांवर ५ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातुलनेत फक्त चार केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली. परंतू प्रत्यक्षात तुरीची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही.
आता शासनाने तुरीची क्षेत्र निश्चिती केली आहे. तरीही केंद्रांवर खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची तूर बाजार समित्यांमध्ये बेभाव विकली जात आहे. बाजारात शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने विकल्या जात असेल तर शासनाद्वारा एमएसपीद्वारे (MSP) खरेदी केल्या जाते.
तुरीचे दर चार महिन्यांपूर्वी १२ हजारांवर होते. मात्र त्यामध्ये सातत्याने घसरण झाली व आता हमीभावापेक्षा कमी झाले आहे. केंद्र शासनाने तुरीला यंदा ७ हजार ५५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे.
त्या तुलनेत बाजारात ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये क्विंटल असा भाव बुधवारी मिळाला आहे. सहा हजारांवर पोत्यांची आवक अमरावती बाजार समितीत झालेली आहे. (Tur kharedi)
तुरीच्या शासन खरेदीसाठी ३ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुदतवाढ दिल्याने २४ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना तुरीची नोंदणी करता येणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Tur kharedi)
असे ठरले तुरीचे क्षेत्र?
खरेदी करण्याचे आदेश असले तरी तुरीची क्षेत्र निश्चिती नसल्याने केंद्रांनी खरेदी सुरू केलेली नव्हती. मात्र, ५ मार्चला प्राप्त शासनाच्या पत्रानुसार मूग, उडिद व सोयाबीन पिकात आंतरपीक असणाऱ्या तुरीचे १०० टक्के गृहीत धरण्यात येणार आहे तर कापसामध्ये आंतरपीक असल्यास तुरीचे ५० टक्के क्षेत्र उत्पादकतेसाठी गृहीत धरण्यात येणार आहे.
चार केंद्रांवरच खरेदी
* तुरीच्या खरेदीसाठी २१ केंद्रांना परवानगी आलेली आहे. यामध्ये 'व्हीसीएमएफ'चे १२ तर 'डीएमओ'चे ९ केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर तुरीची नोंदणी करण्यात आली.
* प्रत्यक्षात तुरीची खरेदी डीएमओच्या चांदूर रेल्वे, दर्यापूर, तिवसा व नांदगाव खंडेश्वर या केंद्रांवर सुरू करण्यात आली. काही केंद्रांचे उदघाटन केले असले तरी खरेदी सुरू झालेली नाही.