Join us

Tur Bajar Bhav : हमीभावापेक्षा कमी दराने तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी भावांतर भुगतान योजना सुरु करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:38 IST

तुरीच्या पिकाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना तुरीचे बाजारात तब्बल तीन ते साडेतीन हजारांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

नासीर कबीरकरमाळा : तुरीच्या पिकाला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना तुरीचे बाजारात तब्बल तीन ते साडेतीन हजारांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

खरीप हंगामात उडीद बरोबर नगदी पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. मागील वर्षी तुरीला अकरा हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला होता. तुरीच्या दरातील तेजी पाहता यंदा शेतकऱ्यांचा कल वाढून पेरणी क्षेत्रातही वाढ झाली होती.

करमाळा तालुक्यात सर्वत्र तुरीचे उत्पादन घेतले गेले. यंदा उडीदला क्विंटलला ९ हजार ते ९५०० रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला, त्यानुसार तुरीला सुद्धा चांगला भाव मिळेल, अशी आशा असतानाच संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात तुरीचे भाव पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

तुरीची आवक वाढणार आहे. नवीन लाल, पांढऱ्या तुरीला किमान ६००० ते ७३५० रुपये दर मिळत आहे. केंद्राने ७५०० रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, या दरापेक्षा कमी दर बाजारात मिळू लागला आहे.

बाजार समितीत तुरीचे भाव (क्विंटलमध्ये)

बाजार समितीकिमान दरकमाल दर
सोलापूर६,७००७,२००
बार्शी८,०००७,२००
मोहोळ६,०००६,५००
अक्कलकोट६,२००७,१७०
करमाळा६,७००७,३००
कुडूवाडी६,६०१७,०१५
मंगळवेढा५,०००६,७००
दुधनी५,०००६,७००

ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल विक्री केला आहे, परंतु हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री झाला असेल, तर शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर भुगतान योजना लागू करावी. मध्य प्रदेश सरकारने हमीभाव दर व मार्केटमधील दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करून दिलासा दिला होता. त्याप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना दरातील तफावतचे अनुदान रूपाने द्यावे. - जयवंतराव जगताप, संचालक, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डसोलापूरशेतकरीशेतीखरीप