Join us

Tur Bajar Bhav : मागील महिन्यात क्विंटलला ९ हजारांवर दर असणाऱ्या तुरीला पुढे कसा मिळेल बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:09 IST

महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात.

सोलापूर : महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या तुरीची घरात थप्पी लावून ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज २०-२५ हजार क्विंटल तूर हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असली, तरी हमी भाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव नसल्याचे दिसत आहे.

मागील तीन-चार वर्षात सोयाबीनच्या दरात काही कालावधी सोडला, तर सुधारणा झाली नाही. क्विंटलला चार हजारांच्या वरती असलेल्या दरात फार अशी वाढ झाली नाही.

भात वाढ होत नसल्याने घरात जागा मिळेल तेथे सोयाबीन ठेवावे लागले आता तुरीलाही जागा शोधावी लागत आहे. जे सोयाबीनचे झाले तेच तुरीचे होत आहे.

नोव्हेंबर महिन्यात ९ हजार रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत होता. त्यामुळे काढणी झालेली तूर थेट विक्रीला जात होती.

वरचेवर बाजारात तुरीची आवक वाढेल तसा भावही कमी होत आहे. सहा हजार रुपयांवर भाव आला, तरी जिल्ह्यात हमी भाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत.

भाव सहा हजारांच्या खाली?तुरीला बाजारात सध्या सहा हजारांपेक्षा अधिक व सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे. विदर्भातील तुरीची आवक वाढल्यास दरात आणखीन घसरणीची शक्यता आहे. सहा हजारांच्या खाली भाव आल्यास तुरीची थप्पी घरात लावून ठेवावी लागणार आहे. यंदा सर्वत्र तुरीचे उत्पादन चांगले होत असल्याने बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. 

संक्रांतीनंतर दरावर संक्रांतडिसेंबर महिन्यापर्यंत आठ हजारापर्यंत असलेला दर जानेवारीत आणखीन कमी झाला आहे. संक्रांतीनंतर आणखीन भाव कमी झाल्याने व होत असल्याने तूर दरावर संक्रांत आली आहे. हमी भाव केंद्र सुरू झाली नाहीत, तर तुरीचे उत्पादन येऊनही शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडण्याची अपेक्षा नाही.

बाजारात तुरीचा भाव कमी झाला तर विकणे परवडत नाही. चांगल्या दराची वाट बघत घरात औषध लावून ठेवले, तरीही किडे होतातच. वेअर हौसला ठेवण्यासाठी भाडे द्यावे लागते. शिवाय दर कधी वाढतील हे सांगता येत नाही. हमी भाव केंद्र सुरू झाले तर साडेसात हजार रुपये हमी भावाने विकता येईल. - दत्तात्रय ननवरे, तूर उत्पादक शेतकरी

अधिक वाचा: E Peek Pahani : राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार; आता सहायकांमार्फत ई-पीक पाहणीला सुरूवात

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डसोलापूरशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसरकारराज्य सरकारशेतीसोयाबीन