Join us

नेपाळमधून टोमॅटोची आयात व तस्करीही; काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 17:59 IST

अनेकांना नेपाळमधून होत असलेल्या यातीमुळे भाव पडण्याची शक्यता सतावते आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे वर्षभर टोमॅटोसाठी मेहनत घेतलेले शेतकरी खूष आहेत.

बदलते हवामान आणि मध्यंतरी टोमॅटोचे पडलेले भाव, यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती मोडून काढली. परिणामी टोमॅटोची आवक घटून बाजारात त्याचे भाव वाढले. पण आता भारत सरकारने नेपाळमधून अडीच हजार टन टोमॅयोची आयात केली असून या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये चलबिचल आहे. अनेकांना नेपाळमधून होत असलेल्या यातीमुळे भाव पडण्याची शक्यता सतावते आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे वर्षभर टोमॅटोसाठी मेहनत घेतलेले शेतकरी खूष आहेत.

एका बाजूला शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची स्थिती असताना दुसरीकडे ग्राहक मात्र टोमॅटोच्या वाढत्या दराने हैराण आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतला. पण या आयातीच्या निर्णयामुळे देशातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भाव कमी मिळतील अशी भीती अनेक शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे. आयातीमुळे चांगले दर घटतील व शेतकऱ्यांना पुन्हा कमी दरात टोमॅटो विकावे लागतील अशी भीतीही त्यांना वाटते आहे. पण सध्या तरी ही आयात अत्यल्प असून त्यामुळे भारतीय बाजारपेठेत टोमॅटोच्या दरावर कुठलेही परिणाम होणार नाहीत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

टोमॅटोची तस्करीहीभारतात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले, तेव्हा नेपाळच्या सीमेलगत असणारे नागरिक नेपाळमधून पेट्रोल भरतानाची चर्चा होती. आता तसाच प्रकार नेपाळच्या टोमॅटोबाबत गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. सध्या नेपाळमध्ये टोमॅटो 25 ते 30 रुपये किलोने उपलब्ध आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते यावेळी नेपाळमध्ये टोमॅटोचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे पावसाळ्यातही नेपाळमध्ये टोमॅटोचे दर स्थिर आहेत. अशा टोमॅटोची अनेकजण परवानगी नसताना चक्क तस्करी करत आहेत. या तस्करीतून अनेकांचे उखळ पांढरे झाले आहे.

नेपाळ सीमेवर असलेल्या झुलाघाट या भारतीय बाजारपेठेतही दोन प्रकारचे टोमॅटो उपलब्ध आहेत. भारताच्या मैदानी भागातून पुरवठा झाल्यानंतर येथे पोहोचणाऱ्या टोमॅटोची किंमत 120 रुपये किलोपर्यंत आहे, तर शेजारील देश नेपाळमधील टोमॅटो भारताच्या सीमावर्ती बाजारपेठेत 60 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहेत. अनेक लोक नेपाळला जाण्याऐवजी भारतातच स्वस्तात टोमॅटो विकत घेत आहेत.

आताच काळजी नको नेपाळचे टोमॅटो आकाराने भारतीय टोमॅटोपेक्षा लहान आहे. शिवाय तस्करी करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता त्याचा परिणाम येथील टोमॅटोच्या बाजारभावांवर होणार नाही असे बाजारभावाशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे. भारत सरकार जेव्हा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आयात करेल, त्याच वेळेस स्थानिक दरावर परिणाम होतील. मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही. शिवाय यंदा अनेक भागात पाऊस उशिरा सुरू झाल्याने, शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीऐवजी दुसऱ्या पिकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळेही भविष्यात टोमॅटोच्या शेतकऱ्यांना वाजवी दर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :नेपाळमार्केट यार्डशेतीशेतकरीहवामान