नामदेव मोरे
दिवाळीत तब्येत बिघडविणाऱ्या साखरेच्या गोड मिठाईची जागा आता आरोग्यवर्धक सुकामेव्याने घेतली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या हंगामात तब्बल ९ हजार टन सुकामेव्याची विक्री होऊन साडेपाचशे कोटींची उलाढाल झाली आहे.
काजू, बदामासोबतच खजुरालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, दिवाळीत भेट देण्यास मिक्स ड्रायफ्रूट्स बॉक्सला प्राधान्य देण्यात आल्याचे यंदा दिसले.
कोरोनानंतर उत्तम आरोग्यासाठी नागरिकांनी आहारामध्ये बदल केला. फास्टफूडची जागा आरोग्यवर्धक पदार्थांनी घेतली. सण, उत्सवातील गोड मिठाईची जागा कमी होऊन सुकामेव्याला पसंती मिळू लागली आहे.
विशेषतः दिवाळीत सुकामेव्याची मागणी प्रचंड वाढण्यास सुरुवात झाली. यावर्षीही एक महिन्यापासून दिवाळीसाठी सुकामेव्याची आवक वाढली होती.
उत्सव काळात बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये ९,१८९ टन सुकामेव्याची विक्री झाली. यात २,२१५ टन बदाम, १,७७९ टन काजू व ३,०८५ टन खजूरचा समावेश आहे.
कच्च्या बदामवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगालाही चालना मिळाली. तब्बल ५५० टन उलाढाल झाली असून बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे त्यांना सुकामेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले. २५० रुपयांपासून ते २,५०० रुपये किमतीचे बॉक्सही उपलब्ध करून दिले.
१०० ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत आकर्षक पॅकिंग करूनही सुकामेवा विकला गेला. संपूर्ण एक महिना ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू होती. सुकामेव्याबरोबर रखा, मैदा व फराळासाठी आवश्यक वस्तूंचीही मोठचा प्रमाणात विक्री झाली.
खरेदीसाठी बाजार समितीलाच पसंती
◼️ शासनाने सुकामेव्याचा व साखरेचा व्यवसायही खुला केला आहे.
◼️ बदाम वगळता इतर अनेक वस्तू नियमनातून वगळल्या आहेत.
◼️ 'एपीएमसी' बाहेरही अनेकजण होलसेल व्यापार करत आहेत.
◼️ यानंतरही ग्राहकांकडून दिवाळीतही बाजार समितीला पसंती देण्यात आली.
◼️ येथे होलसेलसह किरकोळ खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे.
◼️ याशिवाय अनेक वर्षांची व्यापाराची परंपरा व विश्वासार्हता यामुळेही खुला व्यापार झाल्यानंतरही बाजार समितीमध्ये खरेदीसाठीची गर्दी प्रत्येक दिवाळीत वाढतच आहे.
सुकामेव्याची किती विक्री?
सुकामेवा - विक्री (टन)
खजूर - ३,०८५
बदाम - २,२१५
काजू - १,७७९
खारीक - १,०१३
पिस्ता - ३९०
अक्रोड - २३२
किसमिस - १८६
अंजीर - १६६
मिक्स - ७९
चारोळी - ११
७ हजार टन साखर विक्री
एका महिन्यात बाजार समितीमध्ये ७,२०३ टन साखरेची विक्री झाली. घरगुती फराळ, हॉटेलमध्ये मिठाई बनविण्यासाठी साखरेचा वापर केला जात असल्यामुळे इतर वस्तूंपेक्षा साखरेची सर्वाधिक विक्री झाली आहे. जवळपास ३५ कोटी रुपयांची उलाढाल साखर विक्रीतून झाली आहे
अधिक वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाला प्रचंड मागणी; भारतातून कोणत्या देशात किती शेण होतंय निर्यात?
