Join us

पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:45 IST

नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे.

योगेश गुंडकेडगाव : नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबालापुणेबाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे.

नगर तालुक्यातील पोखर्डी येथील अक्षय संजय कराळे या तरुणाने शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतःला शेतीत झोकून दिले. अरणगाव (ता. नगर) येथील १० एकर क्षेत्रात बारा वर्षांपासून तो डाळिंबाची लागवड करतो.

मोठ्या कष्टाने या शेतीची तो राखण करतो. पुणेबाजार समितीत त्याने सोमवारी (दि. ९) आपले डाळिंब विक्रीला नेले. तेथील घाऊक बाजारात त्याच्या डाळिंबाला प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला.

घाऊक बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांप्रमाणे भाव मिळत आहे. अक्षय कराळे यांचा माल सर्वांत दर्जेदार असल्याने त्यांना विक्रमी भाव मिळाला.

१० एकरांत बागअक्षय कराळे यांनी अरणगाव येथे १० एकरांत साडेतीन हजार डाळिंबाची झाडे लावली आहेत. यातून वर्षाला १०० ते १२५ टन इतक्या डाळिंबाचे उत्पादन मिळते. वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्नही यातून मिळते.

पुण्यातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याचा सन्मानयंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील सर्वांत दर्जेदार माल असल्याने पुणे बाजार समिती, पुणे आडते असोसिएशन, व्यापारी संघटना यांच्या वतीने अक्षय कराळे या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला.

असा मिळाला भावशेतकरी अक्षय कराळे यांनी सोमवारी २ टन डाळिंब विक्रीसाठी नेले होते. प्रत्येक डाळिंब ३०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे होते. ३५० ते ४०० ग्रॅमच्या डाळिंबाला ३९० रुपये, ४०० ते ४२० ग्रॅमच्या डाळिंबाला ४३० रुपये, ५०० ते ५५० ग्रॅमच्या डाळिंबाला ५०१ रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला.

गेल्या १२ वर्षांपासून डाळिंबाची लागवड करतो. यंदाच्या हंगामात १२५ टन माल मिळेल असा अंदाज आहे. यातून जवळपास २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. यंदाच्या हंगामात माझ्या डाळिंबाला सर्वोच्च भाव मिळाला. - अक्षय कराळे, शेतकरी

टॅग्स :डाळिंबबाजारमार्केट यार्डफळेफलोत्पादनपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती