अमळनेर खान्देशातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अमळनेरबाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
विशेषतः हरभऱ्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली असून दि. २५ फेब्रुवारी रोजी तब्बल ७१०० क्विंटल हरभरा बाजारात दाखल झाला. शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे.
यंदा रब्बी हंगामात हरभरा आणि मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले गेले. सध्या शेतकऱ्यांकडून मक्याची, हरभऱ्याची, ज्वारीची, तुरीची आणि अन्य धान्याची विक्री जोरात सुरू आहे. मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पिके बाजारात येऊ लागल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
हरभऱ्याच्या वाढत्या आवकमुळे सध्या बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळत असल्याने तालुक्यातील तसेच शेजारील शिंदखेडा, चोपडा, धरणगाव, पारोळा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे शेतमाल विक्रीसाठी येत आहेत.
एकाच दिवसात १० हजार ४०० क्विंटल धान्याची आवक
७१०० क्विंटल हरभरा एकाच दिवसात दाखल झाला आहे. बाजार समितीत बुधवारी एकाच दिवसात १० हजार ४०० क्विंटल धान्याची आवक झाली.
बुधवारी झालेली आवक
धान्य | आवक (क्विं) |
हरभरा (चापा) | ३५०० |
हरभरा (काबुली) | ३५०० |
गहू | ४०० |
लाल मका | २५०० |
तूर | ५०० |
एकूण | १०४०० |
बाजार समितीत वेगवान व्यवहार
• येथील बाजार समितीत माल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच पैसे मिळतात आणि व्यवहार पारदर्शकपणे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. तसेच येथून मोठ्या प्रमाणात रेल्वे रैंकद्वा हरभरा परराज्यात पाठवला जातो, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
• अमळनेर बाजार समितीतील या विक्रमी आवकेमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साह आहे, तर शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत आहेत.