Join us

कोकणातील हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; लवकरच या नवीन आंब्यांची आवक सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:20 IST

कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

यापुढे दक्षिणेकडील राज्यांसह गुजरातची आवक वाढणार असून, जून अखेरीस शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधून आंबा आवक सुरू राहणार आहे.

या वर्षी कडक उन्हामुळे कोकणातील हंगाम लवकर संपणार आहे. देवगड हापूसची आवक जवळपास बंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील आवक १० मेपर्यंत सुरू राहणार आहे.

रायगड जिल्ह्यातील हापूस २५ मेपर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. यानंतर जुन्नर हापूस ग्राहकांना मिळणार आहे. कोकणच्या हापूसनंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व इतर विभागामधून केसरसह इतर आंब्याची आवक होणार आहे.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सुटी असली तरी आंबा हंगामासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट सुरू ठेवण्यात आले होते.

बाजार समितीमध्ये ९८ हजार ६७६ पेट्यांची आवक झाली. यामध्ये कोकणातून ५१ हजार ५७६ पेट्या हापूस व दक्षिणेकडील राज्यांमधून ४७ हजार १०० पेट्या इतर आंब्यांचा समावेश आहे.

मुंबई मार्केटमध्ये आता कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळमधील हापूससह इतर आंब्याची आवक वाढणार आहे. याशिवाय गुजरातमधील हापूस व इतर आंबेही मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत.

गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील हंगाम जून अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. जुलैपासून उत्तर प्रदेशमधील आवक सुरू होईल. ग्राहकांना ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत आंबे उपलब्ध होतील.

अधिक वाचा: यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :आंबाकोकणबाजारमुंबईनवी मुंबईपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीरत्नागिरीरायगडगुजरातआंध्र प्रदेश