Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात येथील भुज, कच्छ येथून आवक; गोड खजूर बाजारात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:09 IST

Sweet Dates : मॉन्सूनने यंदा लवकर हजेरी लावल्याने लालचुटुक अन् चवीला तुरट-गोड कच्चा खजूर मार्केट यार्ड बाजारात दाखल झाला आहे.

मॉन्सूनने यंदा लवकर हजेरी लावल्याने लालचुटुक अन् चवीला तुरट-गोड कच्चा खजूर पुणेमार्केट यार्डबाजारात दाखल झाला आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने फळबाजारात गुजरात येथून तब्बल ३ टन खजुराची आवक झाली.

घाऊक बाजारात १० किलोला ३०० ते ६०० रुपये भाव मिळाला असून, किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात गुजरात येथील कच्छ व भूज भागातून कच्च्या खजूरची आवक होत आहे. यंदा खजुराचा हंगाम पूर्वीपेक्षा दहा दिवस आधीच सुरू झाला आहे.

खजुराचा दर्जाही चांगला असून त्याला जिल्हा, राज्यासह परराज्यातून मागणी आहे. सद्यःस्थितीत हंगामाची सुरवात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास खजुराचा हंगाम लवकरच संपण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

कच्च्या खजुराचा हंगाम दोन महिने राहतो. सद्यःस्थितीत हंगामाला सुरवात झाली आहे. यंदा लवकर पावसामुळे फळांसाठी पोषक वातावरण तयार होऊन ती लवकर परिपक्व झाली. परिणामी पूर्वीच्या तुलनेत दहा दिवस अगोदर फळे बाजारात दाखल झाले आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढून दरात आणखी घट होईल. - सतीश वैरागकर, व्यापारी, मार्केट यार्ड.

हेही वाचा : 'लिंबू' फळबागेने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

टॅग्स :फळेपुणेमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेती क्षेत्र