संजय लव्हाडे
राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता असून, अक्षय तृतीया जवळ आल्याने सोन्याच्या दरातही विक्रमी तेजी आली आहे.
हरभरा खरेदी नोंदणीसाठी सरकारने १ एप्रिलपासून राज्यात केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जालना जिल्ह्यात अद्यापपर्यंत हरभरा खरेदी नोंदणीचे केंद्र सुरू झालेले नाही.
यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जालना बाजारपेठेत हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांकडे विक्री करताना दिसत आहेत.
जालना बाजारपेठेत हरभऱ्याची आवक दररोज १७०० पोते इतकी असून, भाव ५५०० ते ५८३० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. काबुली चण्याचे दरदेखील वाढलेले असून, भाव ६००० ते ९५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. काबुली चण्याची आवक दररोज २०० पोते आहे.
राज्यात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हामुळे ऊस उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घसरले आहे. साखरेचे उत्पादन देखील घटले आहे
निर्णयामुळे फटका
साखर उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर निर्यात आणि इथेनॉल निर्मितीवरील बंधन यासारख्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उसाची एकरी उत्पादकता ७० ते ७२ टनांवर आली आहे, तर साखर उताऱ्यातही घट झाली आहे. जालना बाजारपेठेत साखरेचे दर ४१०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
शेतमाल बाजारभाव
गहू | २३०० ते ४००० |
ज्वारी | २००० ते ४१०० |
बाजरी | २३०० ते २६०० |
मका | १७०० ते २२०० |
तूर | ६१०० ते ७४०० |
सोयाबीन | ४१०० ते ४४०० |
गूळ | ३४०० ते ३९०० |
सोन्याची खरेदी जोरात
अनेक गुंतवणूकदार आजच्या दराने बिस्किट आणि नाण्यांची बुकिंग करून ठेवत आहेत, ज्या कुटुंबांमध्ये मे-जूनमध्ये लग्नसराई आहे, तिथेही भाव आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सोने आजच खरेदी केले जात आहे. सोन्याचे आजचे दर ९६००० रुपये प्रति तोळा असे असून चांदीचे दर ९७००० रुपये प्रति किलो असे आहेत.