सातारा : महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभी राहते ती म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी हे तालुक्याचे मुख्य पीक असून, दरवर्षी सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली जाते.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या फळांचा हंगाम सुरू झाला; मात्र उत्पादन कमी असल्याने विक्रीचा दर प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांवर पोहोचला होता.
आता उत्पादनात वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. १०० ते १५० रुपये प्रतिकिलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री सुरू असून, मागणीतही वाढ झाली आहे.
पोषणतत्त्वांचा खजिना!स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यातील व्हिटॅमीन सी आणि मॅग्नेशियम रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी एक नंबरशेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या स्ट्रॉबेरीची अलीकडे ठिकठिकाणी लागवड केली जात आहे; परंतु महाबळेश्वरची तांबडी माती, त्यामधील गुणधर्म, हवा, पाणी स्ट्रॉबेरी फळासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे येथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचा रंग, रुप, चव सर्वांत भिन्न असते. अन्य कोठेही अशी रंगसंगती, चव व फळे दिसून येत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जगभरात मागणी आहे.
जशी मागणी, तशी विक्री..महाबळेश्वराच्या मातीत चौदा जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. त्यामुळे पर्यटकांना वेगवेगळ्या स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळते. पर्यटकांच्या मागणीनुसार विक्रेत्यांकडून अगदी ३०, ५० व १०० रुपयांच्या स्ट्रॉबेरीचे बॉक्स त्यांना उपलब्ध करून दिले जातात.
स्ट्रॉबेरी वजन अन् साखर कमी करते!स्ट्रॉबेरी सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या फळात कॅलरी व साखरेची मात्रा कमी असते. मुबलक फायबर असतात. या फळांच्या सेवनाने वजन व शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वर्षातून चार ते पाच महिनेच या फळांना हंगाम असतो.
दोन महिन्यांपूर्वी स्ट्रॉबेरीचा दर कमी होता. आता उत्पादन वाढीमुळे तो कमी झाला आहे. या फळात अनेक पोषकतत्त्वे असल्याने पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते. - मुबारक शारवान, शेतकरी
अधिक वाचा: जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर