राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली असून, त्यामुळे दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असताना दरात मात्र, चढउतार होत असल्याने शेतकरीवर्गात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर दबावात होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयापेंडेची मागणी घसरल्याने दर घसरले होते. मात्र, एप्रिलच्या सुरुवातीपासून मागणी वाढू लागल्याने काही दिवस दरात तेजी दिसून आली! तेव्हाच्या तुलनेत सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
एक आठवड्यापूर्वी सोयाबीनचे कमाल सरासरी दर ४६०० रुपये प्रति क्विंटल होते. आता मात्र दरात चढउतार होत आहे. तथापि, गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे सरासरी कमाल दर ५ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक होते. दरात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
दिवसाला १५ हजार क्विंटल आवक
सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागल्यानंतर शेतकऱ्यांचा विक्रीवर भर वाढला आहे. अनेक शेतकरी साठवलेले सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दिवसाला एकंदरीत सरासरी १५ हजार क्विंटलपेक्षाही अधिक सोयाबीनची आवक होत आहे.
गुरुवारी कोठे किती क्विंटल आवक
वाशिम - ५५००कारंजा - ४००० रिसोड - २१५०मं.पीर - १५०० मानोरा - ५००
अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीन शिल्लक
मागील सहा महिने सोयाबीनच्या दरात कोणतीच सुधारणा झाली नव्हती. अपेक्षीत दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्री थांबवून सोयाबीन साठवून ठेवले होते. त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लकच आहे.
हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ