लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लातूर, मार्केट यार्डातसोयाबीनची आवक मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढली आहे. तीन दिवसांत ३२ हजार ६९३ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते. (Soybean Arrivals)
पहिले दोन दिवस ४ हजार ५५० रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटल दर होता. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यात शंभरने घट होऊन ४ हजार ४५० रुपयांपर्यंत आला आहे. आवक वाढली की भाव घसरला हे सूत्र बाजारात पाहायला मिळाले. (Soybean Arrivals)
लग्नसराई तसेच घरगुती आणि सामाजिक कार्यक्रमांचा हंगाम उन्हाळ्यात असतो. त्यामुळेच मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोयाबीनची सर्वाधिक आवक पाहायला मिळाली. (Soybean Arrivals)
कार्यक्रम, उत्सव करता यावेत म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. मात्र, दर कमी मिळत आहे. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे रब्बी आणि खरीप चांगली पिके आली. परिणामी, शेतमाल उत्पादनात वाढ झालेली आहे. सध्या शेतातील उन्हाळी कामे केली जात आहेत. खरीप पेरणीच्या पूर्वीची मशागत शेताची सुरू आहे. (Soybean Arrivals)
शेतमालाची आवक बाजारात वाढली...
* सोयाबीनसह अन्य शेतमालाची बाजारात आवक थोडी वाढलेली आहे. गूळ, गहू, ज्वारी, मोठी ज्वारी, मका, हरभरा, तूर, उडीद, करडई, चिंचा, राजमा आदी शेतमालाची आवक लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात झाली आहे.
* सोयाबीनचा हंगाम संपला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेने सोयाबीन घरी ठेवले आहे. आता दरात थोडी वाढ झाल्याने बाजारात सोयाबीनची आवक तीन दिवसांपासून वाढलेली आहे, असे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
तीन दिवसांतील सोयाबीनचा दर
* १६ एप्रिल रोजी लातूरच्या मार्केट यार्डात सोयाबीन १३,०८३ क्विंटल विक्रीला आले होते. सर्वसाधारण दर ४,५५० रुपये मिळाला तर किमान दर ४,३३१, कमाल ४,७०० रुपये होता.
* १७ एप्रिल रोजी लातूरच्या मार्केट यार्डात सोयाबीनची आवक ११,१८१ क्विंटल होती. सर्वसाधारण दर ४,५६० रुपये तर किमान ४,१११ आणि कमाल दर ४,७१२ रुपये क्विंटल होता.
* १८ एप्रिल रोजी ९,४३९ क्विंटल लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक होती. सर्वसाधारण दर ४,४५० रुपये प्रति क्विंटल तर किमान ४,२०० आणि कमाल ४,६११ रुपये भाव निघाला होता. या तिन्ही दिवसांमध्ये तिसऱ्या दिवशी १०० रुपयांनी दरात घट झाली आहे.
* लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील ही स्थिती आहे. पहिले दोन दिवस आवक आणि दर वाढलेला होता. तिसऱ्या दिवशी दर घटला अन् आवकही कमी झाली.