रूपेश उत्तरवार
यवतमाळ : खुल्या बाजारातसोयाबीनचे दर कोसळले आहेत. याच परिस्थितीत शेतकऱ्यांची गर्दी राज्यभरातील 'नाफेड'(NAFED) च्या खरेदी केंद्रांकडे वळली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या २८८ केंद्रांपैकी विदर्भ, मराठवाड्यातील अनेक केंद्रांवरचा बारदाना संपला आहे. या ठिकाणी ४८ लाख बारदान्याची मागणी झाली आहे.
तूर्त बारदाना नसल्याने याठिकाणची खरेदी थांबली आहे. यामुळे २ लाख ९६ हजार शेतकरी अडचणीत आले आहेत. खुल्या बाजारातसोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपयांपर्यंतचा दर आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या (Marketing Federation) केंद्रांवर सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.
यामुळे सोयाबीनच्या हमी केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. आतापर्यंत राज्यातील २८८ केंद्रांवर ९५ हजार ५९५ शेतकऱ्यांनी १९ लाख ६८ हजार ८६३ क्विंटल सोयाबीनची विक्री केली आहे. अजूनही २ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना २४ लाख १३ हजार क्विंटल सोयाबीन विकायचे आहे.
सोयाबीन खरेदीसाठी लागणारा बारदाना मात्र या केंद्रांवर नाही. यामुळे खरेदी झालेले सोयाबीन ठेवायचे कशामध्ये, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सोयाबीन खरेदी थांबलेली आहे. १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे.
शेतकऱ्यांना ओटीपी जातच नाही
• हमी केंद्रांवर सोयाबीन खरेदी करताना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ओटीपी येतो. त्यानंतरच नोंदणी होते.
• प्रत्यक्षात या खरेदी केंद्रांवर गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मोबाइलला ओटीपीच येत नाही. याशिवाय काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदविलेला नसल्याने अशा शेतकऱ्यांची खरेदी अडचणीत आली आहे.
अशी झाली खरेदी
जिल्हा | क्विंटल |
नांदेड | १,७७,०७८ |
लातूर | १,६७,३२० |
बीड | १,३४,३७७ |
परभणी | ६०,२०९ |
धाराशिव | १,४२,४२२ |
जालना | १,६१,६२२ |
हिंगोली | १,४७,७१५ |
छ. संभाजीनगर | १३,०७७ |
बुलढाणा | २,६१,५२६ |
अकोला | २,३०,०२४ |
वाशिम | ५५,४२९ |