Join us

Soybean Market भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षीचे सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 2:13 PM

यंदा पेरावं काय अन् जगावं कसं; शेतकरी झाले हवालदिल

भाव वाढतील या आशेने आजही ३० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलेले आहे; पण भाव काही वाढेना. साडेचार ते पाच हजारांच्या पुढे भाव सरकेना. आता खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला ३० किलो सोयाबीन बियाणाला ३५०० हजार रुपये मोजावे लागत आहेत. तुम्हीच सांगा शेतकऱ्याची प्रगती कशी होईल, असा सूर शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

सोयाबीन पिकाचा उतारा बॅगला एकरी पाच ते सहा क्विंटल येतो. लागवड व इतर पूर्ण खर्च लावला तर शेतकऱ्यांना काहीच उरत नाही. एक तर पिकाचा उतारा कमी आणि उत्पादित मालाला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीन पेरणीसाठी एकूण खर्च १७ हजार रुपये येतो आणि उत्पन्न मिळते २० हजार रुपये. शेतीमालाला भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.

शेतमालाला भाव मिळाला तरच प्रगती

कधी पावसाचा अभाव, तर कधी अतिप्रमाण झाल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातीच लागलेले नाही. अशा पेचप्रसंगात दुष्काळाचे गडद सावट शेतकऱ्यांसमोर उभे राहते. पिकली तर शेती, नाही तर जिवाची माती, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. शासनाने शेतमालाला चांगला भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही.

शेती करणे अवघड

• शेतमजुरीचे दरदेखील वाढले आहेत. शेतकरी पेरणी, आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात.

• मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे.

शेतकरी कर्जाच्या खाईत

आता शेती करणे परवडत नाही. शेतात केलेला खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ लागत नाही. दिवसेंदिवस ही परिस्थिती कायम असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईतच ढकलला जात आहे. - अतुल पारगावकर, शेतकरी.

हेही वाचा - अंडी उबवणूक केंद्र करेल मदत; कुक्कुटपालन करून कमवा बंपर नफा

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतकरीशेतीमार्केट यार्डबीडमराठवाडाविदर्भशेती क्षेत्रमार्केट यार्ड