परभणी : वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली आहे. सध्या परभणीच्या बाजारपेठेत ज्वारीला (Sorghum in the Market) प्रतिक्विंटल २ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०२४-२५ या रब्बी हंगामात (Rabi Season) २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित केली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी (Farmer) उपलब्ध पाण्याच्या जोरावर ही पेरणी पूर्ण केली.
सर्वाधिक १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा, तर १ लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले. त्यानंतर ४० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी (Sowing Wheat) केली.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण साखर, वजन नियंत्रित राहण्यासाठी आहारात वेळोवेळी बदल (Change) करत आहेत. फास्ट फूडऐवजी आता ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीला हॉटेलसह घरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात दररोजच्या आहारात भाकरीचा वापर होत असला तरी शहरी भागात मात्र कधी तरी बदल म्हणून ज्वारीची भाकरी ताटात मिळते. यंदा ज्वारीचे भाव आणखीन वाढणार आहेत. नव्या ज्वारीचा भाव ३ हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत असल्याने ज्वारीतून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
नव्या ज्वारीला येणार भाव
* वजन, साखर नियंत्रणात राहण्यासाठी आता चपातीऐवजी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्याचबरोबर आता फास्टफूडऐवजी ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीला हॉटेलमध्ये शहरी भागातील नागरिक पसंती देऊ लागले आहेत.
* त्यामुळे बाजारात ज्वारी व बाजरीला भविष्यात मागणी वाढणार आहे. नवीन ज्वारी बाजारात आली तर त्या ज्वारीला किमान ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव राहील, अशी शक्यता परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
जुन्या ज्वारीला २,७०० रुपयांचा भाव
* मागील वर्षी जिल्ह्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ज्वारीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारात वर्षभर २,२०० ते २,७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव ज्वारीला राहिला.
* सध्या तरी नवीन ज्वारी विक्रीसाठी परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डत आली नाही. परभणी जिल्ह्यात जालना, अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर या ठिकाणी ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणावर होते. सध्या ज्वारी काढणीला आली असून महिनाभरात ही बाजारात येईल.
मशागत अन् लागवडीचा खर्चही कमी
* हरभरा, गहू या पिकांपेक्षा ज्वारीला पाणी अन् मशागत त्याचबरोबर रासायनिक खतेही कमी लागतात. त्यामुळे कमी लागवड खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी ज्वारीकडे पाहतात.
* मात्र, सध्या ग्रामीण भागात काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबाला वर्षभर जेवढी ज्वारी लागते. तेवढेच उत्पन्न सध्या घेतले जात आहे. त्यामुळे मशागत आणि लागवडीचा खर्च कमी असूनही शेतकरी केवळ मजूर मिळत नसल्याने दरवर्षी जिल्ह्यात पेरणीचे क्षेत्र कमी करत असल्याचे दिसून येत आहे.
भाकरी खाण्याचा सल्ला
शहरातील वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून वजन व साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी बाजरी व ज्वारीच्या भाकरीचा समावेश करण्याचा सल्ला १०० रुग्णांपैकी २० रुग्णांना दिला जात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्वारी आणि बाजरीच्या शेतमालाला मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा सविस्तर : CCI in High Court: राज्यात २०० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची आवश्यकता