Join us

Solpur Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी रोडवर विकला कांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:39 IST

दररोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या कांद्याचा दर सध्या कमी होत आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मार्केट येथे चक्क दोन रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली.

सोलापूर : दररोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या कांद्याचा दर सध्या कमी होत आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मार्केट येथे चक्क दोन रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. यामुळे ग्राहकांनाही इतक्या स्वस्त दरात कांद्याची विक्री कशी काय होते, असा प्रश्न पडला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. बाजारात कांद्याची उपलब्धता झाल्यामुळे दरात घसरण झाली आहे.

शेतकरी तसेच व्यापारी कांदा हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये न विकता शहरातील रस्त्यावर थांबून विकत आहेत.

रविवारी लक्ष्मी मार्केट येथे एक विक्रेता शंभर रुपयाला ५० किलो विकत होता म्हणजेच एका किलोला दोन रुपये या दराने कांद्याची विक्री होत होती.

मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर वाढले होते. आता पुन्हा कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने ग्राहकांनीही कांदे घेण्यास पसंती दिली.

काही ग्राहक तर इतक्या स्वस्त दराने कशी काय विक्री करता, असा प्रश्न केला? त्यावेळी आवक जास्त झाल्याने कांदा स्वस्त झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या पाच जिल्हे तसेच तीन राज्यांमधून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा येत आहे. तसेच या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे कांद्याच्या उत्पादनातही वाढ झाली.

कांद्याची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगाव यापेक्षाही मोठी उलाढाल सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने दर घसरला गेला.

टॅग्स :कांदाबाजारसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड