Join us

Solapur Kanda Bajar : अपेक्षा होती उन्हाळी कांद्यातून सोनं पिकेल पण बाजारभावाने हाती दिला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 08:37 IST

मार्च महिन्यांपासून नवीन कांदा बाजारात येत आहे. सुरुवातीला ३००० रुपयांचा दर मिळत होता. सरासरी दर २००० रुपयांपर्यंत होता.

विठ्ठल खेळगीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मागील आठवड्यापासून मोठी घसरण झाली आहे. सरासरी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत दर खाली आल्याने शेतकऱ्यांच्या हातात भोपळा मिळत आहे.

कारण, उन्हाळी कांद्यातून सोनं पिकेल, अशी होती. मात्र अक्षरशः माती झाली आहे. सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रमी आवक असते.

दरवर्षी ५०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक असते. यंदा मात्र दिवाळीनंतर आवक वाढली नाही. सरासरी ४०० ते ५०० ट्रक माल येत होता. फेब्रुवारी महिन्यात त्यात थोडी घट झाली. मार्चमध्ये पुन्हा उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाली.

उन्हाळी कांदा मार्केटमध्ये आल्यानंतर कांद्याचा दर एकदम खाली आला. ३००० रुपये प्रतिक्विंटल विकणारा कांदा १५०० रुपयाला विकू लागला. त्यामुळे दरात पन्नास टक्के घट झाली.

उन्हाळी कांद्याला दर चांगला मिळतो, या विश्वासाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करुन कांदा पिकवला आहे. मात्र, दरच कोसळल्याने केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.

नवा कांदा बाजारात आला; भाव कोसळलामार्च महिन्यांपासून नवीन कांदा बाजारात येत आहे. सुरुवातीला ३००० रुपयांचा दर मिळत होता. सरासरी दर २००० रुपयांपर्यंत होता. मात्र, मागील आठ-दहा दिवसांपासून हा दर निम्म्यावर आला आहे. आता १००० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कांद्याची आवक वाढली होती. मात्र, दर कमी झाल्याने आता पुन्हा आवक घटली आहे.

कांदा चाळ नाहीत.. ढीग केल्यास माल खराबदर पडल्याने शेतकरी आता कांदा शेतातच ठेवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कांदा जास्त दिवस टिकत नाही. सोलापूर जिल्ह्यात कांदा चाळीला अनुदान मिळते, मात्र, आपल्याकडे कांदा चाळ कमी आहेत. त्यामुळे कांदा साठवून ठेवणे अवघड आहे. शिवाय, ढीग करुन ठेवण्यास कांदा खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. पुढील काही दिवस दर कमीच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

खर्चात दुप्पटीने वाढदिवाळीनंतर कांद्याची रोपे तयार करण्यासाठी खर्च करावा लागला. त्यानंतर लागवडीचा खर्च वाढला आहे. मजूर मिळत नसल्याने अधिक पैसे मोजावे लागत आहे. काढणीला खर्च मोठा आहे. एका मजुराला आता ३०० ते ४०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

खर्च जिवाच्या वरउन्हाळी कांदा पिकविण्यासाठी खते आणि औषधावर खर्च करावा लागला आहे. कारण, पुढे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कांदा वाळून जाण्याची भीती असते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच कांदा काढणीला यावा, यासाठी औषध फवारणी करण्यात आली आहे.

यंदा उन्हाळी कांद्याची लागवड केली. त्यावर खर्च मोठा झाला. दर चांगला मिळेल, अशी आशा होती. मात्र माल विक्रीसाठी आल्यानंतर दर कोसळला. त्यामुळे केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. - शिवपुत्र बिराजदार, शेतकरी

अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीपीक