वाशिम : मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात पांढऱ्या, काळ्या तिळाची मागणी वाढली आहे. आजच्या घडीला किरकोळ बाजारात तिळाचे दर १७० ते १७५ रुपये प्रतिकिलोवर आहेत.
येत्या काही दिवसांत त्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. अशात मकर संक्रांतीचा गोडवा महागण्याची शक्यता असल्याने आताच तिळाची खरेदी फायद्याची ठरणार आहे.
यंदा दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तिळाची साठवणूक केली होती. मात्र, मागील काही महिन्याच्या तुलनेत आता तिळाच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून बाजार समितीत तिळाला मिळत असलेले १३ हजार ५०० ते १४ हजार रुपये प्रति क्विंटलचे दर आता १० हजार ६७५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. किरकोळ बाजारात मात्र तिळाचे दर १७० रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. तीळसंक्रांतीच्या पृष्ठभूमीवर तिळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
गुळाचा गोडवा कायम
तिळाचे दर काहिशे आताच वाढले असले तरी गुळाचे दर मात्र स्थीर आहेत. मागील वर्षी ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर असलेले गुळाचे दर यंदाही तेवढेच असल्याचे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. तथापि, येत्या काही दिवसांत गुळाचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्याकडे तिळाचे उत्पादन कमी आहे. इतर राज्यातून येणारा तीळही कमीच आहे. त्यामुळे आता १७० ते १७५ रुपये प्रती किलो दराने मिळणारा तीळ आणखी महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, दरात किती वाढ होईल ते सांगणे कठीण आहे. - कैलाश राठी, व्यावसायिक.
उत्पादन घटल्याने दरावर होणार परिणाम
राज्यात यंदा रब्बी हंगामात तिळाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. शिवाय तणनाशकाच्या फवारणीमुळेही तिळाचे पीक करपते. परिणामी यंदा तिळाच्या उत्पादनात मोठी घट येणार असून, रब्बी हंगामातील तीळ बाजारात येण्यास अद्याप बराच वेळ आहे. त्यामुळे तिळाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे.
गतवर्षी होते २४० रुपयांवर !
गेल्यावर्षी २२० ते २४० रुपये किलोवर पोहोचला आहे. तर तीन वर्षापूर्वी तिळाच्या किंमती १०० ते १२० रुपये किलोपर्यंत होत्या. अर्थात गतवर्षी तिळाच्या दरात दुप्पट वाढ झाली होती. त्या तुलनेत सध्या तिळाचे दर कमीच आहेत.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात