Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 10:37 IST

सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे.

सांगोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे.

परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोला-चिंचोली रोडच्या दोन्ही बाजूला दररोज सायंकाळी डाळिंब खरेदी विक्रीचे बाजार मांडल्यामुळे याचा सांगोला बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातील सौदे बंद पडतात की काय, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

सांगोला बाजार समितीच्या वतीने व्यापारी व परप्रांतीय व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक शनिवारी बाजार समितीमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अॅक्शन मोडवर आली आहे.

बाजार समितीचा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती समाधान पाटील यांनी सांगितले. डाळिंबाचे कोठार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात डाळिंबाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने परराज्यातील व्यापारी सांगोल्यात वास्तव्यास आहेत.

परप्रांतीय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डाळिंब खरेदी करू लागल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. परप्रांतीय व्यापारी सांगोला-चिंचोली रोड लगत दररोज दुपारी ४ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी आणलेल्या डाळिंबाची खरेदी विक्री करून रस्त्यालगतच बाजार मांडला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने, दुचाकी वेडीवाकडी उभी केल्यामुळे व रस्त्यालगतच डाळिंबाचे सौदे होत असल्यामुळे उपनगरातील नागरिकांना हा त्रास नित्याचाच झाला आहे.

विविध कारणे सांगून सौदे करण्यास टाळाटाळसांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तेथे व्यापाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधेसह शेड, गाळे उपलब्ध केलेले असताना परप्रांतीय व्यापारी विविध कारणे सांगून बाजार समितीत सौदे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा परप्रांतीय व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी विक्रीसाठी आपला दबदबा निर्माण केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सांगोला पोलिस स्टेशन, नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अधिकाऱ्यासह डाळिंब व्यापाऱ्यांची गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्या डाळिंब व्यापाऱ्याकडे लायसन (परवाना) नाही अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. - समाधान पाटील चेअरमन, बाजार समिती, सांगोला

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीबाजारमार्केट यार्डसोलापूरडाळिंब