Safflower Oil Market : एकेकाळी रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे पहिल्या पसंतीचे पीक असलेल्या करडीला मागील काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. बदलते हवामान आणि शेतमालाला न मिळणाऱ्या भावामुळे आता शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत नाही.
तेलवर्गीय पीक असलेल्या करडीला बाजारात मागणी असली तरी त्याच्या काढणीची प्रक्रिया अधिक किचकट असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे येत्या काळात करडीचे तेल महागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पेरा किती ?
अकोला जिल्ह्यात १ लाख ३० हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. करडीचा पेरा केवळ १५ हेक्टरवरच झाला आहे.
रब्बीचा पेरा
जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख २१ हजार १०४ हेक्टर असून, पेरणी १ लाख ३० हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर झाली. ही टक्केवारी १०७.५० टक्के आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची झाली आहे.
१५ हेक्टरवर करडीचा पेरा
करडीचे सरासरी क्षेत्र २६३ हेक्टर आहे. तथापी, आतापर्यंत केवळ १५ हेक्टर क्षेत्रावर करडीची पेरणी झाल्याची ही पहिलीच नोंद आहे.
पाच वर्षांत करडी पेरा घटला
काही वर्षांपूर्वी तेलवर्गीय पीक म्हणून करडीला पहिली पसंती होती. रब्बी हंगामात शेतकरी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत होते. मागील पाच वर्षांमध्ये मात्र उत्तरोत्तर करडीचा पेरा घटत आहे.
करडीचे तेल २२० रुपये किलो
बाजारात उपलब्ध असलेल्या शेंगदाणा तेलापेक्षाही करडीच्या तेलाचे दर अधिक आहेत. २२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. करडीच्या तेला बाजारात नेहमी जास्त मागणी असते.
करडीचा पेरा का घटला?
करडी काटेरी पीक आहे. काटेरी असल्यामुळे काढणीसाठी मजूर मिळत नाही. याशिवाय उगवणशक्ती कमी असल्याने पेरा घटला.
कमी पाण्यात पैसे देणारे पीक
करडी हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत लागवडीचा खर्चही कमी येतो. शिवाय बाजारात दरही चांगले मिळतात.