संतोष वीर
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील व्यापारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील तांदूळ विक्रीसाठी आणत असून, आजघडीला सर्वात जास्त शारदा तारा या तांदळाला मागणी असल्याचे तांदूळ व्यापारी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, कन्हाड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक तांदळाचे उत्पादन कोकण येथे होते. दरम्यान तांदळात ही विविध प्रकार आहेत. यामधे सातारा जिल्ह्यातील रेठरा, कन्हऱ्हाड तालुक्यातील इंद्रायणी, पश्चिम घाट पायथ्याशी आंबेमोहर तांदूळ व चंद्रपूर गडचिरोली या भागात कोलम हा तांदूळ जास्त पिकवला जातो.
यालाच 'शारदा तारा' असेही म्हटले जाते. एका नागरिकाने दिवसाला किती तांदूळ खावा, याचे विविध निष्कर्ष असले, तरी आजच्या धावत्या युगात फास्ट व विविध पद्धतीने बनवलेला रुचकर पुलाव खाण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागल्याने तांदळाचे भाव देखील प्रत्येक वर्षी कमी जास्त होत आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत शारदा तारा, काली मूछ, आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळाचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. तर, बासमती तुकडा याचे भाव कमी झाले आहेत. तांदळाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्याने महाराष्ट्रात तांदळाच्या संशोधनासाठी कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी येथे केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. तांदळाचे उत्पादन जरी वाढले असले, तरी भावही प्रत्येक वर्षी वाढू लागले आहेत.
१० ते १५ टक्क्यांनी वाढले भाव
मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काही तांदळाचे भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत, तर काही तांदळाचे भाव १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
तांदळाचे विविध प्रकार आहेत. तसे भात बनवण्याचेही विविध प्रकार आहेत. यातही पुलाव व बिर्याणीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुळे तांदळाची मागणी वाढली आहे. - श्रीकांत नकाते, तांदूळ व्यापारी, भूम.
तांदळाचे भाव काय ?
प्रकार | जानेवारी २०२४ | जानेवारी २०२५ |
शारदा तारा | ६५ | ७० |
काली मूछ | ७० | ८० |
अंबेमोहर | ७० | ८० |
इंद्रायणी | ६० | ६५ |
आवड आंबेमोहर, शारदा ताराची
शहरासह तालुक्यातील विविध गावांत लगीन सराईत व सणासुदीच्या दिवसांत शारदा तारा व आंबेमोहर या तांदळाला जास्त मागणी असते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भाव आणखी वाढणार
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी उत्पादनाच्या तुलनेत प्रत्येक वर्षी मागणी देखील वाढू लागली आहे. यामुळे यापुढील काळात सर्वच प्रकारच्या तांदळाचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज येथील व्यापारी व्यक्त करीत आहेत.
नागरिकांच्या जेवणातील आवडीचा घटक भात झाला आहे. यामुळे तांदळाची मागणी वाढत चालल्याने तांदळाचे भाव देखील वाढू लागले आहेत. - नवनाथ हुरकुदे, तांदूळ व्यापारी, भूम.