Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून राेज किमान १,८०० टन कांद्याची तस्करी; निर्यातबंदीमुळे स्पर्धक देशांना फायदा

By सुनील चरपे | Updated: February 15, 2024 14:08 IST

जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे.

नागपूर : जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे. या निर्णयाचा फायदा देशांतर्गत शेतकरी, ग्राहक, व्यापारी व निर्यातदारांना न हाेता, स्पर्धक देश आणि तस्करांचा हाेत आहे.

भारतातून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ व मलेशिया या चार देशांमध्ये राेज किमान ६० कंटेनर म्हणजेच १,८०० टन कांंदा तस्करी करून नेला जात आहे. जगात कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी २९ ते ३० टक्के उत्पादन चीनमध्ये तर २६ ते २८ टक्के उत्पादन भारतात हाेते. भारताने सन २०२२-२३ मध्ये २५.२५ लाख मेट्रिक टन कांद्याची विक्रमी निर्यात करीत ५६१ मिलियन डाॅलर मिळवीत क्रमांक-१ हे स्थान अबाधित ठेवले हाेते. ही निर्यात प्रति माह २.१०, तर जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांत ६.३० लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला.

भारतीय कांदा निर्यातबंदीचा फायदा घेत पाकिस्तानने कांदा निर्यातीसाेबतच त्यांच्या सिंध प्रांतात लागवड क्षेत्रही वाढविले आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांना ८ ते १२ रुपये प्रति किलाे दराने कांदा विकावा लागत असून, ग्राहकांना हाच कांदा २८ ते ३५ रुपये प्रति किलाे दराने खरेदी करावा लागत आहे. विशेष म्हणजे, निर्यातबंदीच्या काळात नाफेड व एनसीसीएफ या सरकारी संस्थांनी सर्वाधिक कांदा खरेदी केला आहे.

जागतिक पातळीवरील दर (प्रति किलाे-भारतीय रुपया)श्रीलंका - १८० ते २०० रुपये.दुबई -  १२५ ते १३५ रुपये.मलेशिया - १२० ते १२५ रुपये.पाकिस्तान - ११० ते १२५ रुपये.बांगलादेश - ८० ते ९० रुपये.

भारतीय शेतकऱ्यांची गळचेपी हाेणारभारतात सध्या खरीप कांदा शिल्लक असताना एप्रिलमध्ये चीन, पाकिस्तान, तुर्की व इराणमधील कांद्यासाेबत भारतातील उन्हाळ कांदा माेठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे. जगात कांद्याचा तुटवडा आणि देशात मुबलक कांदा असताना निर्यातबंदीचा निर्णय घेऊन भारताने हक्काचे ग्राहक देश गमावले आहे. अशा विपरित परिस्थितीत एप्रिलनंतर भारतीय कांदा उत्पादकांची गळचेपी हाेण्याची शक्यता बळावली आहे.

निर्यात घटल्याने मंत्रालय अस्वस्थअलीकडच्या काळात निर्यात घटल्याने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय अस्वस्थ आहे. निर्यात घटण्यामागे लाल समुद्रातील संघर्षाचे कारण पुढे केले जात असून, निर्यात वाढविण्यासाठी आठवड्यातून दाेन बैठकाही घेतल्या जात आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदीला जर मुदतवाढ दिली नाही तर एप्रिलमध्ये भारतीय कांदा निर्यातदारांना पुरेशा ऑर्डर मिळतील का? जगात भारतीय कांदा काेण खरेदी करेल? यासह इतर प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :कांदाशेतकरीपीककेंद्र सरकारचीनपाकिस्तानइराणबाजार