Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर बाजारात एक लाखावर कांदा गोण्यांची विक्रमी आवक; वाचा काय मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:30 IST

Kanda Market Update : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन दिवसांत झालेल्या लिलावात जवळपास एक लाखावर कांदा गोण्यांची आवक झाली.

पारनेर (जि. अहिल्यानगर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी व शुक्रवारी झालेल्या लिलावात जवळपास एक लाखावर कांदा गोण्यांची आवक झाली. त्यामुळे रविवारी (दि. २१) होणारे लिलाव स्थगित करण्याची वेळ बाजार समितीवर आली आहे.

कारण, बाजार समितीच्या आवारात हमालांची संख्या कमी असून, लिलाव झालेला माल कायम आहे. त्यामुळे रविवारचे लिलाव बंद ठेवावे लागल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात बुधवारी ६३ हजार ४६२ कांदा गोण्या, तर शुक्रवारी ४८ हजार ५३९ कांदा गोण्यांची आवक झाली. बाजार समितीच्या जागेव्यतिरिक्त खासगी जागेत कांदा गोण्या ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे रविवारी लिलाल होणार नसून, आता थेट बुधवारी कांदा लिलाव होणार असल्याची माहिती उपसभापती किसनराव सुपेकर व संचालक मंडळाने दिली.

बाजार समितीने जाहीर केलेले भाव समाज माध्यमांवर टाकावे, अन्यथा आडतदारांचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा संचालक मंडळाने बैठकीत दिला आहे. रविवारी लिलाव बंद ठेवल्याने बाजार समिती सचिव व पदाधिकाऱ्यांना कांदा उत्पादकांकडून विचारणा केली जात आहे. बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

व्यापाऱ्यांकडून फक्त तीन ते चार वक्कलला चांगला भाव मिळतो. इतर कांदा कमी दराने खरेदी केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मागील आठवड्यात पारनेर बाजार समितीच्या आवारात ४० रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे बुधवारी व शुक्रवारी नवीन लाल व गावरान कांद्याची आवक वाढली. मात्र, आवक वाढताच कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.

चार व्यापाऱ्यांना नोटिसा

• लिलावात ठराविक एक-दोन वक्कलला सरासरीपेक्षा अधिक भाव काढून शेतकऱ्यांचे दिशाभूल केली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर बाजार समितीने चार व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

• एक-दोन वक्कल १० ते १५ रुपये फरकाने घेऊन त्याचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. ही बाब चुकीची असून, असे प्रकार तात्काळ बंद करावेत, अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस व्यापाऱ्यांना बजावल्याची माहिती सचिव सुरेश आढाव यांनी दिली.

हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी

English
हिंदी सारांश
Web Title : Parner Market Sees Record Onion Arrival, Prices Fluctuate

Web Summary : Parner market witnessed a record arrival of over one lakh onion sacks in two days, leading to Sunday auctions being cancelled. Increased supply caused price fluctuations, disappointing farmers. Traders face license warnings over price manipulation allegations.
टॅग्स :बाजारकांदाअहिल्यानगरमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्र