नवी मुंबई: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी १ लाख १९ हजार पेट्यांमधून तब्बल १,२२३ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये कोकणातील ६४ हजार पेट्यांचा समावेश आहे.
अक्षय तृतीयेला आमरसाला विशेष महत्त्व असते. अनेक घरांमध्ये आमरस पुरी, आमरस पोळीचा बेत केला जातो. यामुळे बाजार समितीमध्येही आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
कोकणासह दक्षिणेकडील राज्यांमधूनही आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातून ६४ हजार तर दक्षिणेकडील राज्यांमधून ५५ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे.
कोकणातील हापूसचा हंगाम आता कमी होत जाणार असून, दक्षिणेकडील राज्यांमधील आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. मेच्या सुरुवातीला गुजरातमधील आंबा विक्रीसाठी दाखल होणार आहे.
देवगड हापूसचा हंगाम ४ दिवसांत संपण्याची शक्यता आहे. रत्नागिरीची आवक २५ मेपर्यंत आणि रायगडचा हापूस ५ जूनपर्यंत उपलब्ध होणार आहे.
जुन्नर हापूस मेअखेरपासून उपलब्ध होणार आहे. जून अखेरीस उत्तर प्रदेशच्या आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
आंब्याचे दर
आंबा | घाऊक | किरकोळ |
हापूस डझन | ३०० ते ८०० | ५०० ते १,३०० |
बदामी किलो | ४० ते ६५ | ८० ते १२५ |
लालबाग | ४० ते ५० | ८० ते १०० |
तोतापुरी | ३० ते ४० | ६० ते ७० |
केसर | ६० ते १०० | १०० ते १२० |
अधिक वाचा: दुष्काळी परिस्थितीवर मात करत जतच्या शेतकऱ्याने घेतले एकरी ७७ टन ढोबळी मिरचीचे उत्पादन