Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या 'या' बाजारात गव्हाची १६ हजार, करडईची २२ हजार क्विंटल विक्रमी आवक; दर मात्र मंदावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:43 IST

परिस्थितीचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी विशेषतः गहू व करडी पिकांच्या क्षेत्रांत मोठी वाढ केली. परिणामी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले; मात्र बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात यंदा गहू व करडी पिकाचे विक्रमी उत्पादन झाले असले, तरी अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. चालू हंगामात गहू सुमारे १६ हजार क्विंटल, तर करडी तब्बल २२ हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे.

मागील काही वर्षाच्या तुलनेत उत्पादनात मोठी वाढ झाली असली, तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे ओढे, नाले, नद्या व तलाव तुडुंब भरले. या अतिरिक्त पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशिराने झाली.

परिस्थितीचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी विशेषतः गहू व करडी पिकांच्या क्षेत्रांत मोठी वाढ केली. परिणामी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले; मात्र बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात धान्याची आवक सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांकडे धान्य मुबलक प्रमाणात असला तरी बाजारात दर कमी असल्याने अनेक शेतकरी स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. अवकाळी पावसामुळे उशिराने बाजारात येणारे काही धान्य हलक्या प्रतीचे असल्याचेही दिसून येत आहे.

यंदा पेरणी क्षेत्र दुप्पट झाल्याने उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. दर मिळत नसल्याने विक्रीसाठी शेतकरी निरुत्साही आहेत.

बाजार समित्यांमधील स्थिती

• अक्कलकोट बाजार समितीत आतापर्यंत गव्हाची १३ हजार क्विंटल आवक झाली असून दर २,००० ते २,७०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. करडीची २० हजार क्विंटल आवक झाली असून दर ५,००० ते ५,५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. गतवर्षी केवळ ७ हजार क्विंटल आवक होती.

• दुधनी बाजार समितीत गव्हाची सुमारे ३ हजार क्विंटल आवक झाली असून दर १,९०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. करडीची १,५०० क्विंटल आवक झाली असून, दर ४,८०० ते ५,४०० रुपयांपर्यंत आहेत. मागील वर्षी गव्हाचा दर सुमारे ३,८०० रुपये होता.

• एकूणच, यंदाचा हंगाम 'उत्पादन अधिक, दर कमी' अशा विरोधाभासी स्थितीत अडकला असून, शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

दरवाढीची प्रतीक्षा

यंदा गहू, करडी व ज्वारीसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, दर घसरल्याने दरवाढीच्या आशेने धान्य साठवून ठेवत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या तुलनेत बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या धान्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

उत्पादन वाढले असले तरी बाजारातील दर कमी असल्याने शेतकरी सध्या थांबून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. काहीजण धान्य साठवून ठेवत आहेत. - स्वामिनाथ स्थावरमठ, सचिव, दुधनी बाजार समिती.

हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Record Wheat, Safflower Arrival in Maharashtra Market, Prices Dip

Web Summary : Despite record wheat and safflower production in Akkalkot, Solapur, farmers face low prices. Arrivals surged to 16,000 and 22,000 quintals respectively. Increased cultivation led to higher yields, but market rates have dropped, causing financial strain. Farmers await price increases, storing their produce.
टॅग्स :मार्केट यार्डसोलापूरशेतकरीशेती क्षेत्रबाजारगहू