वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) नावीन्यपूर्ण पीक असलेल्या 'चिया'च्या खरेदीला ११ फेब्रुवारीपासून थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 'चिया'ला (Chia) तब्बल २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला.
मात्र, अवघ्या पाच दिवसांत दर ११ हजारांनी घसरून १२ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संभ्रम निर्माण झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना प्रत्येकवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका बसून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्या तुलनेत 'चिया' हे नावीन्यपूर्ण पीक जिल्ह्यासाठी लाभदायी ठरल्याने त्याचा पेरा यंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १५ फेब्रुवारी रोजी ८५० क्विंटल 'चिया'ची आवक झाली.
दरम्यान, ११ फेब्रुवारीपासून वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 'चिया' खरेदीला रितसर सुरुवात करण्यात आली. या दिवशी उकळीपेन येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या 'चिया'ला व्यापाऱ्यांकडून २३,००१ रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला. मात्र, १५ फेब्रुवारीला हे दर प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार १०० रुपयांपर्यंत गडगडल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला.
चिया खरेदी करणारी वाशिम बाजार समिती राज्यात एकमेव ! राज्यात सर्वप्रथम वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत चिया खरेदीचे दालन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. हा अपवाद वगळता अन्य कुठल्याच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये चियाची खरेदी सुरू झालेली नाही. ११ फेब्रुवारीला चिया खरेदीची सुरुवात झाल्यानंतर वाशिम बाजार समितीने त्यात खंड पडू दिलेला नाही. स्थानिक स्तरावरच चियाची विक्री करता येण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चियाचे बाजार समितीमधील दर
११ फेब्रुवारी | २३,००१ |
१५ फेब्रुवारी | १२,००० |
संपूर्ण महाराष्ट्रात 'चिया'चे दर प्रतिक्विंटल १२ ते १४ हजार रुपये इतकेच आहेत. चिया खरेदी मुहूर्ताच्या दिवशी, वाशिम बाजार समितीमध्ये ११ फेब्रुवारीला जेमतेम ५ ते ७ क्विंटल इतकीच आवक झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढीस लागून 'चिया'ला सर्वाधिक, २३ हजार रुपये इतका विक्रमी दर दिला गेला. - महादेवराव काकडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम
हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds: 'चिया सीड्स'ची बाजारात एन्ट्री; प्रारंभी काय मिळाला दर वाचा सविस्तर