धाराशिव :सोयाबीनला शासनाचा ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव (Guarantee Price) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी धाराशिव तालुका खरेदी विक्री केंद्रावर (Procurement center) गर्दी केली आहे. एक महिन्यापासून बारदाना नसल्याने आवक मंदावली होती.
काही दिवसांपूर्वी बारदाना उपलब्ध झाला असून, शेतकऱ्यांकडून सोयाबीनची (soybean) आवक वाढली आहे. यामुळे दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे माप एक ते दोन दिवसांनंतर होत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची ऑक्टोबरमध्ये काढणी झाली. मात्र, हमीभाव केंद्र लवकर सुरू झाले नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अडत बाजारात मिळेत त्या भावाने सोयाबीनची विक्री केली.
काही शेतकरी हमीभावाने सोयाबीनची विक्री करण्यासाठी थांबले होते. यासाठी धाराशिव तालुका खरेदी केंद्रात धाराशिव तालुक्यातील ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी हमीभावासाठी ऑनलाइन (Online) नोंदणी केली होती. मात्र, शासनाने वेळेत हमीभाव केंद्र सुरू केले नाही.
यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित सोयाबीनचा माल घरात सुरक्षित साठवून ठेवावा लागला. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर प्रति दिनी ३० शेतकऱ्यांना मेसेज पाठवून सोयाबीन मापासाठी मागवले जात होते.
मात्र, एक महिन्यापूर्वी बारदाना नसल्याने सोयाबीनची आवक कमी झाली होती. मात्र, आठ दिवसांपूर्वी बारदाना उपलब्ध झाला असून, शेतकऱ्यांनी मापासाठी गर्दी केली आहे. आडत बाजारात (MarketYard) शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून हमी भाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होत आहे.
हमीभावाने सोयाबीनची खरेदी करताना शेतकऱ्यांना बारदाना दिला जातो. मात्र, एक महिना शासनाकडून बारदाना आला नाही. चार दिवसांपूर्वी बारदाना मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी माल घालण्यासाठी गर्दी केली आहे. - दीपक शेलार, केंद्र व्यवस्थापक.
४८९२ रुपये प्रतिक्विंटल मिळतोय हमीभाव...
* सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू झाले नव्हते. त्यावेळी नडलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन अडत व्यापाऱ्यांनी कमी भावाने खरेदी केले.
* यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात हमीभाव केंद्र सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.
* ३० शेतकऱ्यांना प्रतिदिन धाडले जाताहेत मेसेज.
८०० शेतकऱ्यांच्या मालाचे झाले माप...
* धाराशिव तालुक्यातील ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी धाराशिव तालुका खरेदी विक्री संघाकडे ऑनलाइन नोंद केली आहे. यातील ८०० शेतकऱ्यांच्या १५ हजार क्विंटलचे माप झाले आहे.
* बारदाना नसल्याने गेल्या एक महिन्यात शेतकऱ्यांना माल आणता आला नाही. सध्या बारदाना उपलब्ध झाला असून, आवक वाढली आहे.