शेषराव वायाळ
दसऱ्याच्या सणानंतर बाजारात फुलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता दर घसरल्यामुळे फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही वसूल होत नाही.
परिणामी, अनेक शेतकरी हताश झाले असून, काहींनी फूलशेतीत फिरकणेही बंद केले आहे. पावसाळ्यात फुलांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्याने दर गगनाला भिडले होते.
मात्र, सध्या फुलांची आवक वाढल्याने बाजारातील दर कोसळले आहेत. यामुळे तोडणी, वाहतूक व मजुरीचा खर्चही निघत नसल्याने उत्पादक चिंतेत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फुलशेतीवर नांगर चालविला आहे.
दिवाळीनिमित्त दिलासा
दसऱ्यानंतर फुलांना अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादकांच्या आशा दिवाळीकडे लागल्या आहेत. दिवाळीच्या सणात गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध यांची मागणी वाढण्याची शक्यता असून, त्यातून दरात काही प्रमाणात सुधारणा होईल, अशी अपेक्षा फूल उत्पादक व्यक्त करीत आहेत.
विविध फुलांचे भाव
प्रकार | मागील भाव | सध्याचे भाव |
काकडा | ६०० | २०० |
झेंडू | १०० | ३० |
गुलाब | १०० | ५० |
शेवंती | १५० | १०० |
गलांडा | ४० | २० |
निशिगंध | ७० | ३० |
फुलांचा दरात सतत चढ-उतार होत असल्याने विक्रेत्यांनाही तोटा सहन करावा लागतो. सध्या दर इतके कमी आहेत की दिवसभर फुले विकूनही नफा मिळत नाही. - अशोक काळे, फूल विक्रेते, परतूर जि. जालना.
पावसामुळे खूप नुकसान झाले. त्या काळात फुले नव्हती, तेव्हा भाव चांगले होते. आता फुले मिळत आहेत; पण दर पडले आहेत. तोडणी, मजुरी आणि वाहतूक याचा खर्चही निघत नाही. शासनाने मदत करावी. शासनाने फूल उत्पादकांच्या संकटाची दखल घेऊन आर्थिक मदतीसह विमा संरक्षण किंवा हमीभावासारखे उपाय करावेत. - रामराव एकलवाले, फूल उत्पादक शेतकरी.