अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवार (दि.२०) सप्टेंबर पासून मोकळा कांदा बाजार लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आज गुरुवार (दि.१८) समितीच्या बैठकीत करण्यात आली.
तसेच आठ दिवसांनी मुख्य श्रीरामपूर बाजार समितीमध्येही मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा निर्णय शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि संघर्षाचा मोठा विजय मानला जात आहे.
दरम्यान (दि. ०७) ऑगस्ट २०२५ पासून श्रीरामपूर बाजार समिती अंतर्गत मोकळा कांदा बाजार अचानक बंद करण्यात आला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. या निर्णयाच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत, दुसऱ्याच दिवशीपासून रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू केला.
त्यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच राज्याच्या पणन संचालक यांच्याशी थेट संपर्क साधत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर या सततच्या आंदोलनाला आणि मागणीला यश मिळाले असून मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज श्रीरामपूर बाजार समितीच्या सभापती सुधीर वेणुनाथ पाटील नवले यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस साहेबराव वाबळे, व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कांदा उत्पादक शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर टाकळीभान उपबाजारात शनिवार पासून आणि मुख्य श्रीरामपूर बाजारात आठ दिवसांनी मोकळा कांदा बाजार पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजचा हा विजय केवळ शेतकरी संघटनेच्या लढ्याचा नाही तर आमच्यावर विश्वास असलेल्या शेतकऱ्यांचा आणि कांदा उत्पादकांचा आहे. - नीलेश शेडगे, स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर.
हेही वाचा : यंदा कांदा रोपांची रोगमुक्त वाढ हवीय? मग 'हा' नैसर्गिक उपाय आवर्जून करा