Join us

Onion Export : लासूर स्टेशनचा ९०० क्विंटल कांदा दुबई, श्रीलंकेला रवाना; असा मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:52 IST

Onion Export : लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणतात. येथे येणाऱ्या कांद्याचा दर्जाही चांगला राहत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. या पार्श्वभूमीवर येथील कांदा आता परदेशातही निर्यात होत आहे. वाचा सविस्तर (Onion Export)

रामेश्वर श्रीखंडे

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमधील ९०० क्विंटल कांदा परदेशात मंगळवारी दुबई व श्रीलंकेत कंटेनरद्वारे रवाना झाला. या कांद्याला १ हजार १०० ते १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Onion Export)

लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणतात. येथे येणाऱ्या कांद्याचा दर्जाही चांगला राहत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. (Onion Export)

या पार्श्वभूमीवर येथील कांदा आता परदेशातही निर्यात होत आहे. येथील कांदा मार्केटमधील घोडके ट्रेडिंगचे मालक कल्याण घोडके यांनी कांद्याची प्रतवारी करत मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात दोन कंटनेरमध्ये १ हजार ५०० बॅगमध्ये भरलेला ६०० क्विंटल कांदा मुंबई येथील बंदराकडे रवाना केला.

मुंबईहून तो जहाजाने दुबईला जाणार आहे. अन्य एका कंटेनरमध्ये १ हजार बॅगांमध्ये भरलेला ३०० क्विंटल कांदा चेन्नईला रवाना करण्यात आला. हा कांदा चेन्नई येथील बंदरातून श्रीलंकेत जाणार आहे. (Onion Export)

केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्याने स्थानिक व्यापारी आपला कांदा परदेशात विक्रीसाठी पाठवत आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा फायदा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (Onion Export)

दुबई व श्रीलंका येथे कंटेनर रवाना करीत असताना चालकाचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सहायक निबंधक तथा प्रशासक किरण चौधरी, सचिव गंगाधर निमसे, सहायक सचित संतोष पवार, अमोल नरोडे, रामदास गावंडे, संकेत घोडके आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

६० एमएमचा कांदा दुबईला

लासूर स्टेशन बाजार समितीमधून मंगळवारी दुबईला ६०० क्विंटल कांदा पाठविण्यात आला आहे. तो ६० एमएमचा असून या कांद्यास १,१०० ते १,२०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. तर श्रीलंकेस पाठविलेला ३०० क्विंटल कांदा ५० एमएमचा असून त्यालाही १,१०० ते १,२०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला, असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

लासूर स्टेशन बाजार समितीमधील मंगळवारचे दर (उन्हाळ कांदा)

सर्वात कमी भाव६०० रु. क्विंटल
सर्वात जास्त भाव१,२०० रु. क्विंटल
सरासरी भाव९०० रु. क्विंटल
एकूण लिलाव झालेली वाहने३५३

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती