lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > शेतकऱ्याशी अरेरावी केल्याने निफाडच्या आडतदाराचा परवाना निलंबित

शेतकऱ्याशी अरेरावी केल्याने निफाडच्या आडतदाराचा परवाना निलंबित

Nifad commission agent's license suspended by Lasalgaon apmc for arguing farmer | शेतकऱ्याशी अरेरावी केल्याने निफाडच्या आडतदाराचा परवाना निलंबित

शेतकऱ्याशी अरेरावी केल्याने निफाडच्या आडतदाराचा परवाना निलंबित

निफाडच्या आडतदाराचा परवाना लासलगाव बाजारसमितीने तत्काळ निलंबीत केला असून शेतकऱ्यांशी व्यापारी किंवा आडत्यांचे गैरवर्तन खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

निफाडच्या आडतदाराचा परवाना लासलगाव बाजारसमितीने तत्काळ निलंबीत केला असून शेतकऱ्यांशी व्यापारी किंवा आडत्यांचे गैरवर्तन खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मार्केट यार्डमध्ये लिलाव झालेल्या सोयाबीनचे पेमेंट मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याशी अरेरावीचे वर्तन करणाऱ्या निफाडच्या आडतदाराचा परवाना लासलगाव बाजारसमितीने तत्काळ निलंबीत केला असून शेतकऱ्यांशी व्यापारी किंवा आडत्यांचे गैरवर्तन खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या निफाड बाजार समितीत दसऱ्याच्या आदल्या दिवशी दिनांक २३ रोजी  रामदास दामोदर लांडभले, रा.सुभाषनगर, ता. निफाड, जि. नाशिक हे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आले होते. लिलावादरम्यान त्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४६९९ रुपये भाव मिळाला. त्याचे एकूण पेमेंट ३२ हजार १०३ रुपये झाले.

ते मागण्यासाठी शेतकरी संबंधित आडते व कमिशन एजंट संजय चोरडीया यांच्या दुकानावर गेले असताना, संबंधित आडत्याने त्यांच्याशी गैरवर्तन करून अरेरावीची भाषा वापरली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली, तर अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

अन‌् परवाना निलंबित 
बाजारसमितीने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित आडतदारांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला. यासंदर्भात लासलगाव बाजारसमितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी ‘लोकमत ॲग्रो’ला सांगितले की बाजारसमितीच्या सभापती आणि सचिव यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून संबंधित अडत्याचा परवाना आम्ही तत्काल निलंबित करण्याची कारवाई केली आहे. शेतकऱ्यांशी सौजन्याची वागणूक ठेवावी अशी तंबीही संबंधिताला देण्यात आली आहे.

नक्की काय घडले?
निफाड बाजारसमितीत सायंकाळी संबंधित शेतकऱ्याने सोयाबीन विक्री केली. दसरा सणासाठी त्याला पैशांची नड असल्याने तो थेट आडतदाराच्या किराणा-भुसार दुकानावर पैसे मागण्यासाठी पावती घेऊन गेला. संबंधित आडतदाराने रोकड संपल्याने पैसे दिले नाही. मात्र हे व्यवस्थित समजावून न सांगता त्याच्याशी अरेरावीची भाषा वापरत अपमानाची वागणूक दिली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

अखेर मागितली माफी
आज सायंकाळी निफाड उप बाजार आवारातील शेतकरी भवनात संबंधित आडतदाराच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी बाजारसमितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संबंधित आडतदार संजय चोरडीया यांनी सर्वांसमक्ष शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिळाले पेमेंट 
दरम्यान झाल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे पेमेंट रात्री उशिरा केल्याची माहिती लासलगाव बाजारसमितीचे सचिव श्री वाढवणे यांनी दिली.

असा करा बाजारसमितीशी संपर्क
१. शेतमालाचा व्यवहार झाल्यानंतर संबंधित आडतदार, कमिशन एजंट किंवा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला त्याचे पूर्ण पेमेंट २४ तासांच्या आत देणे नियमानुसार बंधनकारक असते. बरेचदा व्यापारी आणि शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे संबंध निर्माण झाले असल्याने दोघांच्या सहमतीने हे पैशांचे व्यवहार विक्रीनंतर एक दोन दिवसांतही होतात.

२. अनेकदा बँकांच्या सुटी किंवा वेळ संपल्याने व्यापाऱ्यांकडे रोकड उपलब्ध नसल्याने ते एक तर ऑनलाईन पेमेंट करतात किंवा शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी पेमेंट करतात. त्यामुळे सहसा दोघांमध्ये वादाचे प्रसंग येत नाहीत. त्यामुळे बाजारसमितीकडे तक्रारी जात नाहीत.  लिलावाचे व्यवहार झाल्यानंतर बाजारसमितीचे पर्यवेक्षक त्याच ठिकाणी लक्ष ठेवून असतात. कुणी व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे पेमेंट केले नाही, तर त्याचीही दक्षता घेतली जाते.

३. तरीही कुणी व्यापारी आडतदार पेमेंट देत नसेल, तर शेतकऱ्यांनी बाजारसमितीशी संपर्क केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाते व त्याला व्यापाऱ्याकडून पेमेंट मिळेल अशी व्यवस्था केली जाते.

४. खरेदीचे पेमेंट न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी परस्पर न जाता, बाजारसमितीत तक्रार केल्यास किंवा बाजारसमितीची मदत घेतल्यास त्याचा प्रश्न कुठलाही वाद किंवा मनस्ताप न होता सुटू शकतो.

Web Title: Nifad commission agent's license suspended by Lasalgaon apmc for arguing farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.