पंढरपूर : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या कचाट्यातून सुटका झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यात बेदाणा निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे.
त्यामुळे कोल्ड स्टोअरेज फुल्ल असून, एकाच वेळी बेदाणा मार्केटमध्ये मालाची आवक वाढल्यामुळे दरामध्ये सरासरी ५० ते १०० रूपयांची घसरण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यात उसानंतर सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यानंतर केळी, डाळिंब, चिकू, आंबा आदी फळबागांचे क्षेत्र आहे.
बेदाण्याला ४०० रुपयांपेक्षा जास्त उच्चांकी दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होते. मात्र, गेल्या एक महिन्यापासून हळूहळू नवीन बेदाणा मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर बेदाण्याचा दरही घसरल्याचे चित्र होते.
तर मार्केटिंगच्या द्राक्षाला सुरुवातीच्या काळात ७० ते १०० रुपयांचा मिळणारा दर अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ४० ते ५० रुपयांपर्यंत घसरला होता.
गेल्या १५ दिवसांपासून परिस्थिती बदलत आहे. मार्केटिंगच्या द्राक्षाला १०० ते ११० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, तर बेदाण्याला २८० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यापूर्वी बेदाण्याला ३५० ते ४०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळत होता. मात्र नवा बेदाणा बाजारात उपलब्ध झाल्याने दर काहीसे घसरले असून, ते २८० ते ३५० रुपयांवर आले आहेत. भविष्यातील दरवाढीमुळे काही शेतकऱ्यांनी माल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्याची लगबग सुरू आहे. - कल्याण नाईकनवरे, द्राक्ष, बेदाणा उत्पादक, भोसे
अधिक वाचा: राज्यात शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना आता प्रथम प्राधान्य; रोजगार हमी मंत्र्यांनी दिले 'हे' आदेश?
