NAFED Soyabean Center :
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नाफेडने (NAFED) ६ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याकरिता मुदत दिली होती. पोर्टल(Portal) मधील तांत्रिक अडचणीमुळे चार हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणीच झाली नाही. नोंदणीची वेळ निघून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शासनाकडून नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाते का, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.
नाफेडने महागाव, पांढरकवडा, दिग्रस, बाभूळगाव, आर्णी, पुसद, पाटण, दारव्हा येथे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. मोबाइलवर एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांनीच सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर आणावे, अशी सूचना देण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी १५ हजार ९१ अर्ज ऑनलाइन भरले.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ६ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचेही सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र नोंदणी पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे तब्बल ४ हजार शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहे.
सोयाबीन विक्री नोंदणीची मुदतही ६ जानेवारीला संपल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. ऑनलाइन(Online) नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे.
सोयाबीन व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ
* मुदतवाढ न मिळाल्यास ४ हजार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची पायरी चढावी लागणार आहे.
* ओलाव्याचे कारण पुढे करून सोयाबीनचे भाव पाडण्यात आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
९१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
नाफेडच्या ८ खरेदी केंद्रावर ६ जानेवारीपर्यंत सहा हजार ३१ शेतकऱ्यांच्या ९१ हजार ६३१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ४४ कोटी ८२ लाख ५ हजार ८९० इतकी आहे.