अमरावती : नाफेडद्वारा (Nafed Center) २१ पैकी १५ केंद्रांवरच तुरीची (Tur) खरेदी होत आहे. त्यातच यंत्रणांद्वारा तूर खरेदीची मंदगती असल्याने हरभरा (Harbhara) खरेदीसाठी अद्याप नोंदणी सुरू नाही.
किंबहुना शासनस्तरावर तसे नियोजन दिसून येत नाही. त्यामुळे हरभरा (Harbhara) मातीमोल दराने विकल्या जात आहे. मागील वर्षी १२ हजार रुपये क्विंटलवर गेलेली तूर चार महिन्यांत सात हजारांवर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
शेतकऱ्यांना हमीभावाचे (MSP) संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने २४ जानेवारीपासून तुरीची (Tur) नोंदणी सुरू करण्यात आली व जिल्ह्यात डीएमओ व व्हीसीएमएफच्या २१ केंद्रांवर नोंदणी व खरेदीचे नियोजन करण्यात आले.
सद्यस्थितीत या सर्व केंद्रांवर ८,५३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्या तुलनेत आतापर्यंत फक्त १,६१० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आलेली आहे.
६ हजार शेतकरी बाकी
या सर्व खरेदी यंत्रणांची तूर खरेदीसाठी मंदगती असल्याने नोंदणी केलेले ६ हजार शेतकरी बाकी आहेत. महिनाभरापासून हरभऱ्याचाही हंगाम सुरू झालेला आहे व अशा परिस्थितीत शासन खरेदीसाठी नोंदणीच नाही.
१ एप्रिलपासून नोंदणीची पत्र, यंत्रणेला पत्र नाही
१ एप्रिलपासून हरभऱ्यासाठी नाफेडची ऑनलाइन नोंदणी सुरू होत असल्याची चर्चा सध्या यंत्रणांमध्ये होत आहे. मात्र सध्या जिल्हा विपणन अधिकारी व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही कार्यालयास हरभरा खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करण्याचे पत्र प्राप्त नाही. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
अशी आहे तुरीची खरेदी (क्विं.)
व्हीसीएमफ : धामणगाव ५७८२, मोर्शी २०५७, वरुड ३६२४, अंजनगाव सुर्जी ३१, येवदा ८८, कापूसतळणी १३१, गणेशपूर ७६८, शिंगणापूर १५४३ व बाभळी ८५५ क्विंटल
डीएमओ : अचलपूर (जयसिंग) २७१, अचलपूर १२८५, चांदूर रेल्वे ३७७३, दर्यापूर ८२१, नांदगाव खंडेश्वर १७६४ व तिवसा केंद्रांवर ९८५ क्विंटल.