Join us

नाफेड अन् एनसीसीएफचा कांदा सप्टेंबर मध्ये होणार बाजारात दाखल; वाचा काय सुरू आहेत हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:38 IST

NAFED Onion Market : नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली.

नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली.

सप्टेंबरच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात नाफेडने खरेदी केलेला कांदाबाजारात येईल, तर एनसीसीएफचा कांदादेखील याच दरम्यान बाजारात येऊ शकेल. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला व स्टॉक करून ठेवलेला कांदादेखील बाजारात येणार असल्याने भाव आणखी गडगडतील व त्याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांनाच बसण्याची भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

सप्टेंबरात कांद्याचा बंफर स्टॉक बाजारात येणार असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळणार असल्याने केंद्र शासनाला शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करावे लागेल, असे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले. नाफेड तसेच एनसीसीएफला प्रत्येकी दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

पहिल्या तीन आठवड्यांत या दोनही केंद्रीय संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रांना प्रतिसाद मिळाला नाही. नाफेडची कांदा खरेदी बंद करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी करूनदेखील सरकारने याची दखल न घेता कांदा खरेदी कवडीमोल भावात सुरूच ठेवली होती. शेतकऱ्यांना कमी दाम दिले गेले. आता नाफेडने कांदा बाजारात आणल्यावर किमान ग्राहकांचे तरी भले होईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिल्लीतील बैठकीत भावावर चर्चा

सोमवारी (दि. २५) दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात बैठक झाली. यात नाफेड व एनसीसीएफची कांदा खरेदी किती झाली, किती दिवसांपर्यंत खरेदी सुरू ठेवायची तसेच नाफेडचा कांदा बाजारात आल्यावर काय भाव द्यायचा यावर चर्चा झाली. त्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीस आणण्याचे धोरण निश्चित झाले.

दिल्लीतील पथकाकडून खरेदी केंद्रांवर झाडाझडती

• प्राप्त माहितीनुसार चार ते पाच दिवसांपूर्वी दिल्लीतील पथकाने नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रात तपासणी केली. यात आवक, जावक रजिस्टर तपासले.

• नाफेडच्या कांदा खरेदीत दरवर्षीच घोळ होत असल्याच्या तक्रारी पाहता यंदा केंद्र सरकार अधिक खबरदारी घेत असून, तपासणीतून काय साध्य झाले? हे सांगण्यात नाफेडच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे याबाबतचे गुढ कायम राहिले आहे.

• वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही नियमित तपासणी होती, असे सांगून शाखाधिकारी पटनायक यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले.

हेही वाचा : राज्यातील मका उत्पादकांना यंदा लागली मुरघासाची ओढ; धान्य उत्पादन घटणार का?

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीनाशिकबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसरकार