Join us

या कारणाने माथाडी कामगार आंदोलन स्थगित; नगर मधील बाजार समितीचे कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:33 IST

Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले.

केडगाव : शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले.

माजी सभापती भानुदास कोतकर यांनी मध्यस्थी करीत बाजार समितीला पाच दिवसांची मुदत वाढवून घेतली. त्यामुळे माथाडी कामगारांनी तूर्त आंदोलन मागे घेतल्याने गुरुवारचे कांदा लिलाव सुरळीत पार पडले.

बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल उतरून घेण्याचे काम माथाडी कामगार करतात. त्यासाठी कामगार आयुक्तांनी त्यांना तीन रुपये दराने आवक वाराई देण्याचे आदेश काढले होते. मात्र, बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.

नेप्ती उपबाजारात एक रुपये दरानेच आवक वाराई व्यापाऱ्यांकडून दिली जाते. याबाबत माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.

मात्र, या मागणीकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी रात्री बारा वाजेनंतर माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी होणारे कांदा लिलाव वेळेत सुरू होऊ शकले नाहीत.

कामगार आवक वाराई तीन रुपये करण्यावर ठाम होते. त्यामुळे कांदा आवक व जावक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

हमाल माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिव अभय भिसे, संचालक नीलेश सातपुते, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी आदी यावेळी उपस्थित होते.

५ दिवसांची मुदत नेप्ती उपबाजार समितीने मागितली होती. त्यानुसार माथाडी कामगारांनी आपले आंदोलन तूर्त मागे घेऊन बाजार समितीला निर्णय घेण्यासाठी ही मुदत दिली आहे. आता बाजार समिती काय निर्णय घेते याकडे कामगारांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २० वर्षांपासून माथाडी कामगार एक रुपया आवक वाराई घेऊन काम करतात. आमची मागणी चार रुपये होती. याबाबत माथाडी बोर्डाकडे चर्चा झाली. पत्रव्यवहारही झाला, मात्र आमची मागणी दुर्लक्षित आहे. किमान तीन रुपये वाराई मिळावी, त्यावर तोडगा काढावा. - अविनाश घुले, अध्यक्ष, हमाल माथाडी संघटना

अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अ‍ॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर

टॅग्स :मार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीअहिल्यानगरकांदाशेतकरीकामगार