हिंगोली : मकर संक्रांत निमित्त बाजार समितीच्या वतीने मोंढा आणि संत नामदेव हळद मार्केट यार्डातील (Market Yard) शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार दोन दिवस बंद ठेवले होते.
गुरुवार (१६ जानेवारी) पासून शेतमालाची खरेदी- विक्री पूर्ववत सुरू झाली असून, या दिवशी सोयाबीनची आवक वाढली होती.
मकर संक्रांतीचा सण साजरा करता यावा, यासाठी अडते, खरेदीदार व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार १४ आणि १५ जानेवारी रोजी मोंढ्यातील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
मोंढा बंद असल्यामुळे दोन दिवसांत खुल्या बाजारातसोयाबीनसह इतर शेतमालाची खरेदी-विक्री वाढल्याचे पाहायला मिळाले.
१६ जानेवारीपासून मात्र बाजार समितीकडून मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत करण्यात आले. सोयाबीन व हळदीची आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीन, तूर विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु, दोन्ही शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाही. सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे यंदा किमान सहा हजारांचा भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते.
मात्र, मोंढ्यात सरासरी चार हजारांवर भाव गेला नाही. तर शेतकऱ्यांकडे तूर उपलब्ध होताच बाजारात क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी भाव गडगडले.
शेतकऱ्यांकडे शेतमाल येताच भाव घसरल्याचा अनुभव अलिकडच्या कळात नेहमीचाच झाला आहे. यातून मात्र लागवडखर्चही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मोंढ्यातील शेतमालाची आवक
शेतमाल | आवक (क्विं.) | सरासरी भाव |
तुर | २०५ | ७,१४७ |
सोयाबीन | १०५० | ४,०५० |
हळद | ११२५ | १३,६५० |