संजय लव्हाडे
जालना : नवीन हरभरा बाजारात (Market) आला असून, हमी दरावर तुरीसाठी (Tur) नोंदणी सुरू झाली आहे. सोन्याच्या दरात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. खाद्यतेल (Oil) आणि सर्व प्रकारच्या डाळींच्या (Pulses) दरात मंदी आली आहे.
सध्याच्या हंगामात नाफेडने २७१४ शेतकऱ्यांकडून ४० हजार ७०० क्विंटल सोयाबीन हमी भावाने खरेदी केले आहे. सोयाबीन आणि तुरीचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तूर हमी भावात खरेदी करणे सुरू केले असून, त्याची नोंदणी २४ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील शेतऱ्यांनी शनिवारपर्यंत नोंदणी केल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
तूर खरेदीसाठी राज्यभरात जवळपास ३०० केंद्र सुरू झाले असून, तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी.
तसेच, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. 'नाफेड' अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन, तसेच विदर्भ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.
सोने उच्चांकी पातळीवर
* जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमती वाढण्यात झाला आहे. एकाच आठवड्यात सोन्याने दोन वेळा उच्चांकी दर पातळी गाठली.
* सोमवारपासून सुरू होणाऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सोने दरात आणखी एक हजार रुपयांची वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जालना सराफा बाजारात सोने ८१ हजार रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ९२ हजार रुपये प्रति किलो असे आहेत.
दर हमीभावापेक्षा कमी
* हरभऱ्याचा भाव आता हमीभावापेक्षाही कमी झाला.
* आता नवा माल मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
* भारताने हरभरा आणि इतर कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली.
* त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आयात वाढली. सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे.
* यंदा सरकारी खरेदी जास्त होईल. म्हणजेच, बाजाराला हमीभावाचा आधार असेल.
शेतमाल | बाजारभाव |
गहू | २७०० ते ४५०० |
ज्वारी | २१५० ते ३४२५ |
बाजरी | १८०० ते ३१०० |
मका | १४०० ते २२०० |
तूर (पांढरी) | ६००० ते ७६५० |
तूर (लाल) | ६८०० ते ७५५० |
तूर (काळी) | ६८०० ते ७१०० |
हरभरा | ४७०० ते ५९०० |
सोयाबीन | ३४०० ते ४७०० |
गूळ | ३२०० ते ४१०० |
साखर | ३९०० ते ४१०० |
तेलाचे दर काय?
पामतेल | १४३०० |
सूर्यफूल तेल | १४००० |
सरकी तेल | १३४०० |
सोयाबीन तेल | १३२०० |
करडी तेल | २१००० |