Market Update : शेतमालाला योग्य भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा लागली आहे. सरकारने हा दरकोंडींचा तिढा लवकरात लवकर सोडवावा.
शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखली जाणारी हळद पडत्या भावामुळे काळवंडली आहे, तर सोयाबीनचीही दरकोंडी कायम आहे.
इतर शेतमालाचेही भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमीच असल्याने जिल्ह्यातील शेतकरी भरडले जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्रावर सोयाबीनपाठोपाठ हळदीची लागवड होते. यंदा एप्रिल, मे महिन्यात हळदीला सरासरी १५ हजारांचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
समाधानकारक भावामुळे येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डात हिंगोलीसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक झाली.
परंतु, जून लागताच भावात घसरण होत गेली ती अजूनही कायम आहे.
सध्या हळदीला सरासरी १२ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव एप्रिल, मे महिन्यांच्या तुलनेत अडीच ते ३ हजार रुपयांची कमी मिळत आहे.
परिणामी, भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्री न करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
सोयाबीनची परिस्थिती हळदीपेक्षा वेगळी आहे. दोन महिने हळदीला समाधानकारक भाव मिळाला होता. परंतु, सोयाबीन मात्र मागील दोन वर्षांपासून
शेतकऱ्यांना पडत्या भावात विक्री करावे लागत आहे.
सरासरी ४ हजार ५०० रुपयांचाही पल्ला गाठत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीतून लागवड खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु सध्यातरी व्यापारी भाववाढीची शाश्वती देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकरी संकटात सापडले आहेत.
पडता भावः शेतकऱ्यांत नाराजीचा सूर
मागील दोन वर्षांपासून सोयाबीन पडत्या भावात विक्री करावे लागत आहे. परिणामी, लागवड खर्चही वसूल होत नसून बी-बियाणांसाठी काढलेल्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोईवर वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतमालाला समाधानकारक भाव मिळावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - शिवाजी फटांगळे, शेतकरी, बोराळा
खरिपाची पेरणी लागताच हळदीच्या दरात घसरण झाली. पूर्वीच्या तुलनेत आता मिळणारा भाव क्विंटलमागे अडीच ते ३ हजार रुपयाने कमी आहे. सोयाबीन उत्पादकांना तर लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, सरकारही शेतमालाच्या दराविषयी गंभीर दिसत नाही.- श्रीधर मुंढे, शेतकरी, बासंबा
सोयाबीनला केवळ ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी आहे. सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळाला तर शेतकऱ्यांना परवडते. परंतु, सध्याच्या भावात शेतमाल विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे शेतमालाला समाधानकारक भाव मिळणे आवश्यक आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे. - सचिन घुगे, शेतकरी, बासंबा
सोयाबीन विक्री करावी तरी कुठे?
शासनाने यंदा ४ हजार ८९२ रुपये सोयाबीनला हमीभाव जाहीर केला. परंतु, लागवड खर्चाच्या तुलनेत हा भाव कमी असून, परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय हमीभाव घेण्यासाठी नाफेडचे केंद्र गाठावे लागते. त्या ठिकाणी सोयाबीनची चाळणी, काडीकचरा बाजूला काढून खरेदी होते. यात शेतकऱ्यांनाच फटका बसत आहे, तर मोंढ्यात तर सोयाबीन ४ हजार ५०० रुपयांचाही पल्ला गाठत नाही. त्यामुळे सोयाबीन विक्री कुठे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
हळद उत्पादकांना क्विंटलमागे अडीच हजाराचा फटका
हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यामध्ये हळदीला सरासरी १५ हजारांचा भाव मिळाला होता. परंतु, आणखी भाव वाढेल, या आशेपोटी काही शेतकऱ्यांनी हळद विक्री केली नाही. जूनपासून मात्र भावात घसरण होत गेली ती अजूनही कायम आहे. सध्या सरासरी १२ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत क्विंटलमागे अडीच ते तीन हजार रुपयांचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल
शेतीमाल | आवक (क्वि. मध्ये) | सरासरी भाव |
गहू | ३५ | २,६०० |
ज्वारी | १९ | १,९०० |
सोयाबीन | १,५०० | ४,१९७ |
हळद | १,५५० | १२,५०० |