संजय लव्हाडे
मकर संक्रांतीनिमित्तबाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली असून, जालना शहराच्या बडी सडकवर घेवर फेणीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळगुळाचे भाव कमी झाले, हे उल्लेखनीय आहे.
कोटा कमी जाहीर झाल्यामुळे साखरेच्या दरात मात्र तेजी आली आहे. नाफेडमध्ये बारदाना उपलब्ध नसल्यामुळे सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संक्रांतीनिमित्त जालन्यातील घेवर फेणी जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बडी सडक भागात एक महिना अगोदरपासून घेवर आणि फेणीची दुकाने थाटली जातात. अवघ्या एक ते दीड महिन्यात घेवरफेणीच्या खरेदी विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल होते.
यावर्षीदेखील बडी सडकवर सुमारे २५ ते ३० घेवर फेणीची दुकाने सजली असून, ग्राहकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जालन्याची घेवर फेणी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांत आणि परदेशातदेखील निर्यात केली जाते. यावर्षी घेवर फेणीच्या दरात थोडी वाढ झाली असून, भाव ३०० ते ८०० रुपये प्रतिकिलो असे आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तीळ, गूळ आणि तीळगुळाचे पदार्थ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. तिळाचे दर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे साधारण २५ ते ३० रुपयांनी कमी आहेत.
जालना बाजारात तिळाचा दर १६० ते १८० रुपये प्रतिकिलो असे असून गुळाचा दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलो असे आहे. बाजारपेठेत साखरेचा भाव ३,७५० ते ३,९५० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
बाजारभाव
गहू - २,८०० ते ४,०००ज्वारी - २,१०० ते २,९००बाजरी - २,१५० ते ३,१५०मका - २,१४० ते २,२००हरभरा - ४,६०० ते ६,०००मूग - ६,६०० ते ९,०००
सोयाबीनची पाच हजार पोती आवक
• जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक दररोज ५,००० पोते इतकी असून, भाव ३,६०० ते ४,७५० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. नाफेडमार्फत सोयाबीनची आतापर्यंतची खरेदी १,४९५ शेतकऱ्यांकडून २२,८६३ क्विंटल इतकी झाली आहे.
• तसेच सीसीआयमार्फत आतापर्यंत ३,००० शेतकऱ्यांकडून ९६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापसाचा दर ७,१२४ ते ७,४२१ रुपये प्रति क्विंटल इतका आहे.