जालना : नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून बारदान्यांची अडचण दूर झाली आहे. साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून तूर, तूरडाळ आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे.
जानेवारी महिन्याचा कोटा कमी दिल्यामुळे साखरेच्या दरात मोठी तेजी आली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन कमीच राहणार आहे. साखरेच्या दरात तेजी कायम राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे. जालनाबाजारपेठेत साखरेचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
सराफा बाजारात सोन्याच्या दराने ८० हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली. सोने महाग होऊन सोन्याचे दर ८० हजार ४०० रुपये एवढे झाले आहेत.
जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा ८२ हजार ८१२ रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात सोने- चांदीच्या दरात तेजी आली. चार महिन्यांनंतर सोन्याचे दर ८० हजारांवर आले आहेत.
बाजारभाव
गहू - २८०० ते ४५००
ज्वारी - २००० ते ३३००
बाजरी - २१०० ते ३४००
मका - १८०० ते २३६२
गूळ - २७०० ते ३५००
पामतेल - १४५००
सूर्यफूल तेल - १४८००
२९१९३ क्विंटल सोयाबीनची खरेदी
• नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून मागील काही दिवसांपूर्वी बारदाने उपलब्ध नसल्याने होणारी अडचण आता दूर झाली आहे.
• १९३० शेतकऱ्यांकडून २९१९३ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
आवक वाढल्याने दर पडले
• तूरडाळीच्या दरात ५० रुपयांची घट झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत १७५ रुपये किलोपर्यंत तूरडाळीचे भाव होते ते आता घसरून १२५ रुपये किलोपर्यंत आले आहेत.
• मागणीपेक्षा जास्त आवक आहे. या शिल्लक राहणाऱ्या साठ्याचा अंदाज घेऊनच बाजारातील दर आतापासूनच पडण्यास सुरुवात झाली आहे.