Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव मिळेना; कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:00 IST

Onion Update : कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला प्रतिकिलो ५ ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला प्रतिकिलो ५ ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

त्यामुळे सध्या विक्री न करता कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे अआंबेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांदा बराखी चाळीत साठवून ठेवला जात आहे.

इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव हा अतिशय कमी असून, यामध्ये उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच तालुक्यात इतरही ठिकाणी यंदा पहिल्या टप्प्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेल्या कांद्याची काढणी सुरू झालेली असून, बाजारात मोठ्या प्रमाणात नव्या कांद्याची आवक होत आहे.

परंतु सध्याचा मिळत असलेला बाजारभाव हा उत्पादन खर्चापेक्षा ही कमी झाल्याने कांदा चाळीत साठवणुकीकडे कल वाढला आहे.

जेव्हा बाजारभाव वाढेल तेव्हा कांदा विक्री

सध्या कांद्याची साठवणूक करायची व जेव्हा बाजारभाव वाढेल तेव्हा हा कांदा विक्रीसाठी आणायचा असे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. त्यासाठी बराकी निर्माण केल्या आहेत.

पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण केल्यास कोंब फुटतात. काही वेळा कांदे सडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. होणारे नुकसान लक्षात घेऊन येत्या काळात शास्त्रीय पद्धतीने कांद्याची साठवण करावी. साठवण करताना योग्य काळजी घेतली तर निश्चितपणे कांद्याचा दर्जा चांगला राहतो. - महेश मोरे, व्यापारी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, जि. पुणे.

मार्च अखेर आल्याने पीक कर्जाचे हप्ते, मुलामुलींचे लग्न यांचा खर्चाचा भार शेतकरी वर्गावर आहे. मात्र, अचानक बाजारभाव घसरल्याने या भावात कांदा विकून कर्ज व हप्ते भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे चांगल्या बाजारभाव मिळण्याकरिता कांदा चाळीमध्ये साठवून ठेवावा लागणार आहे. शासनाने कांद्याला हमीभाव देण्याची गरज आहे. - राम गावडे, संचालक बाजार समिती मंचर, जि. पुणे.

कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी नवीन कांदा चाळ बांधत असून दहा टन कांदा साठवण्यासाठी अंदाजे ६० हजार रुपये खर्च येतो. कांदा चाळ बांधण्यासाठी प्रत्येक शेतकरी कामाला लागले आहेत. मात्र कारागिराची कमतरता पडत आहे. - सुनील टाव्हरे, वेल्डिंग कर्मचारी पारगाव, जि. पुणे.

हेही वाचा :  वर्षातून एकदाच मिळणारा गुणकारी आतड्यांची ताकद वाढविणारा दुर्मिळ 'चिगूर'

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमंचर