सांगली : जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये मक्याचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास १० ते २० हजार हेक्टर असणारे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे क्षेत्र सध्या ४१ हजार हेक्टरवर गेले आहे. तसेच रब्बीमध्येही १६ ते १७ हजार हेक्टरवर पेरणी होत आहे.
मक्यापासून इथेनॉल निर्मितीला केंद्र आणि राज्य शासन प्रोत्साहन देणार आहे. असे झाले तर मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करताना दिसत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात देशाचा पैसा हा इंधनाच्या आयातीवर खर्च होत आहे. त्यामुळे सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उत्पादन देशात अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
पेट्रोलियमची आयात कमी करून ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे. इथेनॉलमुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा प्रदाता म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहेत.
यासाठी सरकार मक्यापासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच 'इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
याची जबाबदारी अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.
मका लागवडीचे क्षेत्र किती?जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर मका लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या दहा वर्षांत मक्याचे क्षेत्र ६० टक्क्यांनी वाढले आहे. रब्बी हंगामातही १६ ते १८ हजार हेक्टरपर्यंत मका लागवड होत आहे. मक्यास क्विंटलला २३०० ते २५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन मिळत आहे. यामुळे शेतकरी मका उत्पादनाकडे वळले आहेत.
इथेनॉल निर्मितीसाठी मागणी वाढली१) आतापर्यंत पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. तर २०२५ पर्यंत ते २० टक्क्यांवर नेले पाहिजे. त्यामुळे केवळ उसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर सरकार भर देत आहे.२) मक्याचा बहुतांशी उपयोग आज पशुखाद्यासाठीच होत आहे. सांगली जिल्ह्यात पशुखाद्य निर्मितीसाठी रोज १०० ते १५० ट्रक मक्याची गरज आहे, असे कंपनीचे उत्पादक सांगत आहेत.
मका लागवडीसाठी अडचण काय?मक्यावर प्रामुख्याने लष्करी आळीचा फैलाव जास्त आहे. तसेच अनेकवेळा उत्पादन वाढल्यानंतर दर कमी होत आहेत. म्हणून शेतकरी अचानक मका पिकाची पेरणी कमी करत आहेत.
इथेनॉल उत्पादनासाठी मक्याला योग्य दर मिळतो का?इथेनॉल उत्पादनासाठी म्हणून सध्या फारसा मका जात नाही. पण, इथेनॉल निर्मितीच्या कारखान्यांची संख्या वाढल्यास निश्चित मक्याचे दर वाढतील, असे शेतकरी विश्वास पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: कृषी विभाग रब्बी हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर; पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी