नामदेव मोरेनवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे वाढलेली मागणी व आवक कमी होत असल्यामुळे लिंबूचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १० रुपयांना एक लिंबू विकला जात आहे.
सद्यःस्थितीत आंध्र प्रदेश व तेलंगणामधील लिंबूवर सर्व देशाची मदार अवलंबून असून, मुंबईमधून विविध राज्यांमध्ये लिंबूचा पुरवठा केला जात आहे.
राज्यातील लिंबू हंगाम संपला असून, सध्या आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांतील लिंबू सर्व देशभर वितरित केले जात आहेत. तीव्र उकाडा असल्यामुळे ग्राहकांकडून लिंबू सरबताला मागणी वाढली आहे. घर, हॉटेलमध्ये जेवणाबरोबर लिंबूचा वापर केला जात आहे.
शुक्रवारी मुंबई बाजार समितीमध्ये लिंबाची ९५ टन आवक झाली. घाऊक बाजारामध्ये ३ ते ५ रुपये दराने लिंबू विकला जात असून, किरकोळ बाजारात हाच दर १० रुपयांवर पोहोचला आहे.
सात महिने महाराष्ट्राचा हंगामलिंबू उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्राचाही महत्त्वाचा वाटा आहे. अहमदनगर, सोलापूर व इतर जिल्ह्यांमध्ये लिंबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जून ते फेब्रुवारीदरम्यान देशभर राज्यातील लिंबू पुरविला जातो. मार्च ते मेमध्ये दक्षिणेकडील राज्यांतून लिंबूंचा पुरवठा होते.
२० एप्रिलपासून कर्नाटकमधून आवकबाजार समितीमधून मुंबई, नवी मुंबई, ठाणेसोबतच गुजरात, गोरखपूर, अमृतसर, जम्मू-काश्मीर, जयपूर व इतर शहरांमध्येही लिंबूंचा पुरवठा केला जात आहे. २० एप्रिलपासून कर्नाटकमधील आवक सुरू होणार आहे. यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यामुळे लिंबूची मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत आंध्र प्रदेश व तेलंगणामधून आवक होत आहे. २० एप्रिलपासून कर्नाटकमधून आवक सुरू होणार असून, त्यानंतर दर कमी होतील. - गौरव केशवानी, लिंबू व्यापारी
अधिक वाचा: Shevga Export : पंढरपूर तालुक्यामधील शेतकरी महिला गटाचा शेवगा दुबईला रवाना