Zendu Flower Market : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसोबतच फुलशेतीलाही फटका बसला आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा, डच गुलाब यांसारख्या फुलांची मागणी वाढली असली तरी यंदा उत्पादन घटल्याने बाजारपेठेत दर चढ-उतार होत आहेत. (Zendu Flower Market)
बुधवारी परभणी शहरात झेंडूचा भाव प्रति किलो १०० ते १२० रुपये इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूच्या फुलांचा भाव तब्बल ३० ते ४० रुपयांनी वाढला आहे. (Zendu Flower Market)
अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे नुकसान
मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
झेंडू, गुलाब, शेवंती यासह विविध फुलांची लागवड पावसामुळे पाण्याखाली गेल्याने उत्पादन घटले आहे.
परिणामी, नवरात्र- दसरा सणासुदीत दरवाढ होऊन ग्राहकांना महागाईची झळ बसते आहे.
बाजारपेठ गजबजली
वसमत तालुक्यातील कुरुंदा, आंबा चोंडी, सुकळी कोठारी, सेलू या गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर झेंडू उत्पादन करतात.
हे शेतकरी थेट परभणी बाजारात तसेच नांदेडच्या बाजारपेठेत झेंडू विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
परभणीतील अष्टभूजा देवी मंदिर परिसर, गुजरी बाजार, स्टेशन रोड, स्टेडियम रोड, जिंतूर रोड या भागांत शेतकऱ्यांची गर्दी दिसली.
शहरातील सुमारे ४०० हून अधिक फुल व हार विक्रेते या हंगामात कार्यरत असतात.
दरवाढीमागची कारण
पावसामुळे उत्पादन घटल्याने झेंडूसह विविध फुलांची आवक कमी झाली.
मागणी मात्र नवरात्र आणि दसरा सणामुळे वाढ होताना दिसली.
शेतकरी थेट बाजारात माल घेऊन आल्याने दर १००-१२० रुपये किलोपर्यंत पोहोचले.
जागेलाही द्यावे लागतात पैसे
शेतकऱ्यांना फुलशेतीतून मिळकतीची मोठी अपेक्षा होती. पण पावसामुळे नुकसान झालेल्या उत्पादनाची विक्री करताना शहरात जागा मिळवण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्याची तक्रार त्यांनी मांडली.
आधीच शेतीत नुकसान झाले, त्यात विक्रीसाठी बसायलाही जागेचा पैसा मोजावा लागतो, अशी खंत उत्पादकांनी व्यक्त केली.
काही ठिकाणी स्थानिक व्यापारी व गाळेधारकांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचेही सांगण्यात आले.
दसरा- दिवाळीसाठी अपेक्षा
जरी यंदा उत्पादन कमी झाले असले तरी आगामी दसरा आणि दिवाळीमुळे झेंडू व इतर फुलांच्या विक्रीत वाढ होईल, असा अंदाज आहे.
शेतकरी म्हणतात, किमान या सणासुदीत थोडाफार दर टिकला तर नुकसान भरून निघेल.
वसमत तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी परभणीसह नांदेड बाजारपेठ गाठून थेट विक्री केली आहे. उत्पादन घटल्याने दर वाढले असले तरी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई होणे कठीणच आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईचा फटका बसणार असून शेतकरी विक्रीतून थोडासा दिलासा मिळेल, अशी आशा बाळगून आहेत.